जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची विशेष उपस्थिती
खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या कॉमन सर्व्हिस सेंटरचा शुभारंभ आज सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या शुभहस्ते खारेपाटण सोसायटीच्या मुख्य इमारत कर्यालयात फित कापून करण्यात आला. खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकरी सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला सहाय्यक निबंधक कणकवली के आर धुळप,कणकवली विकास अधिकारी एस टी कुडतरकर, व्हाइस चेअरमन सुरेन्द्र कोरगावकर, माजी तृप्ती माळवदे,माजी संचालक भाजपा शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,संचालक भाऊ राणे, मंगेश गुरव,इस्माईल मुकादम,संदेश धुमाळे,श्रीधर गुरव,मोहन पगारे, उज्ज्वला चिके,रवी शेट्ये,संतोष सरफरे,अशोक पाटील संस्थेचे सचिव अतुल कर्ले आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. “खारेपाटण सोसायटी ही जील्हातील नावाजलेली संस्था असून आज या सोसायटीमध्ये डिजिटल सहकार क्रांतीचा उदय झाला असून याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होणार असून सुमारे ४०० प्रकारच्या सरकारी व गैर सरकारी ऑनलाईन सेवा एकाच छताखाली मिळणार आहेत.त्यामुळे कॉमन सर्व्हिस सेंटर मुळे खऱ्या अर्थाने शेतकरी वर्गाचा विकास होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी यावेळी सी एस सी उद्घघाटन प्रसंगी बोलताना केले.” सहकारातून समृद्धीकडे जाण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर उपयोगी पडणार असून शासनाच्या विविध योजना व अत्यावश्यक असणारे विविध प्रशासकिय दाखले आता थेट खारेपाटण सोसायटीमध्ये मिळणार असल्याने शेतकरी वर्ग बरोबरच येथील नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.सदस्य तथा सोसायटीचे चेअरमन रवींद्र जठार यांनी यावेळी केले. तर खारेपाटण सोसायटीच्या वतीने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा शाल पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार सूर्यकांत भालेकर यांनी मानले.













