कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव पटेलवाडी ते गावठणवाडी मार्गे ओसरगावचे ग्रामदैवत लिंग माऊली देवालयाकडे जाण्यासाठी अखेर लोकसहभागातून रस्ता बांधण्यास सुरुवात झाली आहे. कित्येक वर्षे पूर्णपणे रस्ता नसल्यामुळे या भागातील लोकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे गावातील सर्व लोकांनी एकत्र येत रस्त्यासाठी विना मोबदला जमीन देण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे कच्चा रस्ता जेसीबीने साहाय्याने करण्यास सुरुवात झाली आहे.
मधुकर राणे यांच्या हस्ते ग्रामदेवतेला श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे, मुरलीधर परब, नंदू गावडे, प्रदीप राणे, गणेश राणे, विश्वनाथ परब, मनोज बागवे, गजानन परब, विद्याधर मेस्त्री तसेच गावातील मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या रस्त्यामुळे शॉर्टकट देवालयाकडे जाणारा रस्ता हायवेवरून उपलब्ध होणार आहे. शाळेतील मुले, रेशनिंग दुकानावर येणारे ग्रामस्थ, पटेलवाडी, गावठणवाडी, मळीवाडी, सडेवाडी, बौद्धवाडी यासारख्या वाड्यांना जोडणारा रस्ता यामुळे तयार होणार आहे. तसेच हा रस्ता देवालयाकडे जात असल्यामुळे या रस्त्याला भविष्यात महत्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे भविष्यात ग्रामपंचायतने व शासनाने कायमस्वरूपी खडीकरण, डांबरीकरण होण्यासाठी पावले उचलावी, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले जाणार आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले. रस्त्याची सोय उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.











