आचऱ्याच्या विघ्नहर्त्याला भावपूर्ण निरोप
४१ दिवसांच्या भक्तिमय सेवेनंतर गणरायाचे समुद्रात विसर्जन
आचरा (प्रतिनिधी) : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’चा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, फुलांनी सजवलेल्या भव्य रथाचे लोभस रूप आणि निरोपाच्या क्षणी भाविकांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू… अशा भक्तिमय आणि भावस्पर्शी वातावरणात आचऱ्याच्या लाडक्या गणरायाला शनिवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या ‘कसबा आचरे चौघड्यावरच्या गणपती’च्या शाही विसर्जन सोहळ्याने आचरा समुद्रकिनारा भक्तीच्या जनसागराने फुलून गेला. तब्बल ४१ दिवस मनोभावे सेवा केलेल्या विघ्नहर्त्याच्या विसर्जनावेळी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे, समुद्राच्या लाटांचा निनाद आणि हजारो भाविकांच्या मुखातून घुमणारा जयघोष यांचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला. परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचा अनोखा आविष्कार घडवणाऱ्या या सोहळ्याने आचरेवासीयांच्या मनात भावपूर्ण आठवणींचा ठेवा निर्माण केला.
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या शाही गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता श्रींचे उत्तरपूजन करण्यात आले. यानंतर आचरा देऊळवाडी आणि मेस्त्रीवाडी येथील ग्रामस्थांनी श्रींची आरती केली. दुपारी १ वाजता तोफेच्या सलामीने आणि ‘श्री गजानन महाराज की जय’च्या जयघोषात शाही विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.
देव रामेश्वर मंदिरातून निघालेल्या या मिरवणुकीत आचरा गावातील बँजो पथकासह कोल्हापूर येथील भैरवनाथ लेझीम पथक सहभागी झाले होते. आकर्षक पुष्पसजावटीने सजवलेल्या भव्य रथातून श्रींची मूर्ती मार्गस्थ झाली. मंदिरापासून आचरा तिठा, बाजारपेठ, भंडारवाडी, काझीवाडा, गाऊडवाडी आणि आचरा बंदरमार्गे मिरवणूक पिरावाडी येथील देव चव्हाट्यावर दाखल झाली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा निनाद आणि बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
समुद्रकिनारी महाआरती; मावळत्या सूर्याच्या साक्षीने विसर्जन
पिरावाडी येथील देव चव्हाट्यावर श्रींची मूर्ती काही काळ भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. यावेळी मच्छीमार बांधवांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने गणरायाचे दर्शन घेतले. ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित भाविकांना शीतपेये, लाडू आणि मोदकांचा प्रसाद वाटप करण्यात आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही समुद्रकिनारी भाविकांसाठी पाणीवाटप केले.
यानंतर विसर्जन मिरवणूक समुद्रकिनारी दाखल झाली. मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे, समुद्राच्या लाटांचा निनाद आणि हजारो भाविकांची उपस्थिती अशा भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. ‘मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’च्या गजराने समुद्रकिनारा दुमदुमून गेला. आरतीनंतर श्रींच्या मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देताना अनेक भाविक भावुक झाले. समुद्रकिनारी जमलेला भक्तांचा अथांग समुदाय आणि लाटांच्या साथीने घुमणारा जयघोष हे दृश्य उपस्थितांच्या मनावर कायमचे कोरले गेले.
सहा तासांच्या मिरवणुकीत मुंबईकरांसह दशक्रोशीतील भाविकांचा सहभाग
सुमारे सहा तास चाललेल्या या भव्य विसर्जन मिरवणुकीत आचरा दशक्रोशीतील ग्रामस्थांसह मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि गोवा येथून आलेले गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आचऱ्याच्या पारंपरिक धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यात हिंदू बांधवांसोबतच गावातील मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांनीही सहभाग घेतला. विविध धर्मांच्या नागरिकांनी एकत्र येत उत्सवात सहभाग नोंदवल्याने सामाजिक सलोखा आणि धार्मिक एकात्मतेची सुंदर परंपरा अधोरेखित झाली.
विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी आचरा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
निरोपाचे अश्रू, पुढील वर्षाच्या आगमनाची आस!
तब्बल ४१ दिवसांच्या भक्तिमय सेवेनंतर लाडक्या गणरायाला निरोप देताना आचरेवासीयांच्या मनात आनंदासोबत विरहाची भावनाही दाटून आली होती. डोळ्यांत अश्रू, ओठांवर बाप्पाचा जयघोष आणि मनात पुढील वर्षीच्या आगमनाची आस घेऊन भाविकांनी आपल्या विघ्नहर्त्याला निरोप दिला. शाही थाट, पारंपरिक धार्मिक विधी, भक्तीचा उत्साह आणि सर्वधर्मीयांच्या सहभागातून साकारलेला हा सोहळा आचऱ्याच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणारा ठरला. गणरायाच्या विसर्जनाने उत्सवाची सांगता झाली असली, तरी त्याच्या भक्तिमय आठवणी आणि पुढील वर्षीच्या आगमनाची ओढ प्रत्येकाच्या मनात कायम राहिली.










