तळेरे येथील कु.सार्थक वायंगणकर याची चौदा वर्षांखालील सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट संघात निवड

सार्थक हा कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा आठवीतील विद्यार्थी: अभिनंदनाचा वर्षाव

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता आठवीत शिकणाऱा विद्यार्थी आणि तळेरे गावातील रहिवासी असलेला कुमार सार्थक राजकुमार वायंगणकर याची चौदा वर्षांखालील सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्रच अभिनंदन केले जात आहे.

नुकत्याच सावंतवाडी येथे झालेल्या निवड चाचणीत सार्थक वायंगणकर याने चांगली चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांची चौदा वर्षांखालील मुलांच्या सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. तो उत्कृष्ट फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून कामगिरी बजावत आहे. गेल्या चार वर्षांपासून तो ओझरम येथील शिवमुद्रा ॲकडमीचे प्रशिक्षक मयुर गोरुले आणि वैभववाडी येथील अनय स्पोर्ट्स ॲकडमीचे प्रशिक्षक सुमेध कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली लेदर बाॅल क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. त्याचबरोबर शालेय गटातील कॅरम आणि स्वॅश खेळात देखील चमकदार कामगिरी बजावली आहे. सार्थक हा तळेरे येथील क्रिकेटपट्टू आणि राजवैभव चायनीज सेंटरचे संचालक राजकुमार वायंगणकर यांचा चिरंजीव आहे.

कु.सार्थक याच्या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. बिसूरे, विद्यालयाच्या संस्थेचे पदाधिकारी तसेच तळेरे येथील श्री गांगेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

कु.सार्थक याच्या निवडीबद्दल तळेरे गावचे माजी सरपंच आणि श्री गांगेश्वर क्रीडा मंडळाचे जुन्या फळीतील खेळाडू व पदाधिकारी शशांक तळेकर यांच्या हस्ते सार्थक यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या शालेय समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, निलेश सोरप, राजकुमार वायंगणकर, संजय खानविलकर, प्रकाश वायंगणकर, शरद वायंगणकर, पोलीस दलातील गणेश भोवड, अभिमन्यू पाताडे तसेच वायंगणकर कुटुंबातील सर्व नातेवाईक उपस्थित होते.

error: Content is protected !!