महामार्ग पोलीस मदत केंद्र कणकवलीचे वाहनचालकांना आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : महामार्गावरील वाढते रस्ते अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करून जबाबदारीने वाहन चालवावे, असे आवाहन महामार्ग पोलीस मदत केंद्र, कणकवलीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली आडकुर यांनी केले आहे.
महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी वाहनाचा वेग निर्धारित मर्यादेत ठेवणे, चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करणे, दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घालणे आवश्यक आहे. मद्यसेवन करून वाहन चालविणे तसेच वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे किंवा संदेश पाहणे हे अपघातांना निमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी अशा प्रकारांना पूर्णपणे टाळावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महामार्गावर प्रवास करताना पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर राखावे. घाईघाईने ओव्हरटेक करणे टाळून लेन शिस्तीचे पालन करावे. वाहन चालविताना झोप किंवा थकवा जाणवत असल्यास वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवून पुरेशी विश्रांती घ्यावी आणि त्यानंतरच पुढील प्रवास सुरू करावा. दिशादर्शक चिन्हे आणि वाहतूक सूचनांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नका !
पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हट्टापायी त्यांच्या हाती दुचाकी किंवा अन्य वाहने देऊ नयेत. अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे त्यांच्या स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पालकांनी विशेष खबरदारी घेऊन मुलांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.
रस्ते अपघात रोखणे ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. काही मिनिटे वाचविण्याच्या घाईत स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये. वेगापेक्षा जीवन अनमोल असून, आपला प्रवास सुरक्षित असेल तरच आपल्या कुटुंबाचा आनंद सुरक्षित राहील. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालवावे आणि सुखरूप घरी पोहोचावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली आडकुर यांनी महामार्ग पोलीस मदत केंद्र, कणकवलीच्या वतीने केले आहे.










