— शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा; दारिस्ते येथील राहत्या घरी निधन
कनेडी (प्रतिनिधी) : अखिल कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष तथा उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनील लक्ष्मण ठाकूर (वय ५७) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवार, दि. २४ ऑक्टॉबर रोजी दारिस्ते येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने कणकवली तालुक्यात शिक्षण आणि सामाजिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, वहिनी असा मोठा परिवार आहे.
सुनील ठाकूर यांनी आपल्या शिक्षण व अध्यापनाच्या पेशाला नेहमीच पुरेपूर न्याय दिला. ‘विद्यार्थी हाच जीवनाचा खरा गाभा’ असे मानत त्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना घडवण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात आणि विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. केवळ शालेय अभ्यासक्रमच नव्हे, तर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी जिल्हा, विभागीय तसेच राज्य पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून दिले. शाळेला डिजिटल बनवण्यात आणि विविध स्पर्धांमध्ये शाळेचा नावलौकिक उंचावण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
उत्कृष्ट शैक्षणिक कार्यामुळे त्यांनी आपल्या नावावर विविध पुरस्कारांची मोहोर उमटवली होती. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी शिक्षक क्षेत्रात एक आदराचे स्थान निर्माण केले होते. तसेच, माध्यमिक विद्यालय नाटळ माजी विद्यार्थी संघाचे ते सक्रिय पदाधिकारी म्हणूनही कार्यरत होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कणकवली तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेला शिक्षक क्षेत्रातील बांधवांसह राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, तसेच त्यांचे आदरयुक्त ऋण मानणारे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील ठाकूर यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान आणि त्यांचे साधे, प्रेमळ व्युत्मत्व सदैव स्मरणात राहील.










