काळसे रवळनाथ मंदिर नजीक येथे नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे – धामापूरच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापणा व विविध कार्यक्रमांचे आयोजन

चौके (अमोल गोसावी) : बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूर यांच्या वतीने काळसे रवळनाथ मंदिर नजीक दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करून रविवार १५ ऑक्टोबर ते बुधवार २५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त विविध धार्मिक , सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम आणि गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये दररोज सकाळी देवीची नित्यपूजा , दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता महा आरती आणि ७ :३० वाजता स्थानिक तसेच निमंत्रित भजन मंडळाचे भजन होणार आहे. या व्यतिरिक्त आज रात्री ९ वाजता श्री देवी सातेरी महिला फुगडी मंडळ यांचा फुगडीचा कार्यक्रम होणार आहे. तर बुधवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी रात्रौ ९ वाजता लोकराजा कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरुर यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता महिलांसाठी ” खेळ पैठणीचा ” आयोजित करण्यात आला आहे . शनिवार २१ ऑक्टोबर रोजी रात्रौ ९ वाजता वेशभूषा स्पर्धा , आणि सोमवार दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आणि देवीकडील साड्यांचा लकी ड्रॉ असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत याबरोबरच दररोज रात्रौ गरबा आणि दांडीया नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, आणि बुधवार २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता महाआरती करून भव्य विसर्जन मिरवणूक काढून दुर्गामातेचे भक्तीभावात विसर्जन करण्यात येणार आहे. तरी दुर्गामातेच्या या महाउत्सवाला उपस्थित राहून देवी भक्तांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूरच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!