मंगेश लोके यांच्या उपोषणाला यश ; वैद्यकीय अधिक्षकांसह फार्मासिस्ट मंजूर

वैभववाडी ग्रामीण रुग्णालयावरील विघ्ने होणार दूर ; जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पाटील यांनी बहुतांश मागण्या केल्या मान्य

वैभववाडी (प्रतिनिधी) : समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या वैभववाडी तालुका ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुधारावा यासाठी वैभववाडी तालुका शिवसेना उबाठा प्रमुख मंगेश लोके यांनी छेडलेल्या आमरण उपोषणाला यश आले असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीधर पाटील यांनी बहुतांश मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिले आहे. सिव्हिल सर्जन डॉ पाटील यांचे लेखी पत्र जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध इंगळे , वैद्यकीय अधीक्षक डॉ पोटे यांनी मंगेश लोके याना सुपूर्त केल्यानंतर लोके यांनी आपले उपोषण मागे घेतले. वैभववाडी ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या गर्तेत सापडले असून गोरगरीब जनता आरोग्य सुविधेपासून वंचित राहत असल्याकडे वैभववाडी शिवसेना उबाठा कडून वारंवार लक्ष वेधूनही जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून दाद मिळत नव्हती. ग्रामीण रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय अधीक्षक पद, रिक्त फार्मासिस्ट पद, रिक्त क्लार्कपद, रिक्त स्टाफ, आदी पदे भरणे, सुसज्ज प्रसूतिगृह सुरु करुन तज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ नियुक्ती करणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कायमस्वरूपी सोय, रुग्णांना शासकीय निकषानुसार मोफत भोजन आदी सुविधांच्या मागण्यांसाठी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी वैभववाडी ग्रामीण रुग्णालय आवारात आज आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, लक्ष्मण रावराणे, स्वप्नील धुरी, रोहित पावसकर, जितेंद्र तळेकर, शिवाजी राणे, अतुल सरवटे, सुनील कांबळे, गणेश पवार, दीपक पवार, सत्यवान सुतार, जयेश पवार, विलास नावले, गुलजार काझी, यशवंत गव्हाणकर, श्रीराम शिंगरे, राजाराम गडकर, समाधान काडगे, विठोजी पाटील, नितीन शेलार, भीमराव भोसले, सुनील पांचाळ, सूर्यकांत परब, सुनील रावराणे, बंडू सावन्त, रणजित तावडे, सिद्धेश रावराने, संजय हिर्लेकर, मयूर दळवी, प्रवीण काडगे, आनंद नादलस्कर, भालचंद्र जाधव, संदेश सुतार, धाकोजी सुतार, गोट्या साळुंखे आदी शिवसैनिक उपस्थित होते. लोके यांच्या उपोषणाचा धसका घेतलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पाटील यांनी मागण्या मान्य करत असल्याचे लेखी पत्र पाठवले. लोके यांच्या मागणीनुसार आता वैभववाडी ग्रामीण रुग्णालयासाठी दर आठवड्याला बुधवार आणि गुरुवार दिवशी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 असलेले डॉ पोटे हे कार्यभार सांभाळणार आहेत. आरबीएसके अंतर्गत कार्यरत असणारे फार्मासिस्ट आता वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचा नियमित कारभार सांभाळणार आहेत.जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक कुडतरकर हे वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचे प्रशासकीय कामकाज पाहतील, पं स च्या आवारातील विहिरीवरून पाईप लाईन द्वारे ग्रामीण रुग्णालयात नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे, ऑपरेशन थिएटर साठी जिल्हा नियोजन मधून आवश्यक निधींच्या तरतुद केली जाईल, लॅब मध्ये आवश्यक चाचणी साठी एच एल एल मार्फत आवश्यक सुविधा देण्यात येईल, कैलास फूड संस्थेमार्फत रुग्णांना जेवणाची व्यवस्था करण्यात येईल,राज्य स्तरावरून वेळेत निधी उपलब्ध करून ग्रामीण रुग्णालयातील कार्यरत डॉक्टर व स्टाफ चे पेमेंट नियमित वेळेत केले जाईल, मागील 5 वर्षांत रुग्णालय अनुदान व झालेला खर्च याची लेखी माहिती 5 दिवसांत दिली जाईल असे लेखी आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीधर पाटील यांनी दिले.त्यानंतर मंगेश लोके यांनी आपले उपोषण मागे घेतले.

error: Content is protected !!