आचरा (प्रतिनिधी) : “दिवाळी अंक हा परिपूर्ण साहित्य संच असतो. त्यात कथा, कविता, वैचारिक लेख, परिसंवाद असे भरपूर वाचनीय साहित्य असते. म्हणून तो प्रत्येक मराठी माणसाच्या घरात जायला हवा. घरातील प्रत्येक व्यक्तीस काहीतरी यातील आवडेलच. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी याची मदत होऊ शकते. आज जवळपास पावणेसातशे दिवाळी अंक प्रकाशित होतात. आजगावच्या का. र. मित्र यांनी लावलेले हे रोप अजून बहरतेय. यात आपणही योगदान दिले पाहिजे.” असे विचार कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यानी व्यक्त केले. निमित्त होते आजगाव साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सदतिसाव्या कार्यक्रमाचे.
आजगाव मराठी शाळेत झालेल्या या कार्यक्रमाचा विषय होता ‘साहित्य सृष्टीत दिवाळी अंकांचे महत्त्व’. विनय सौदागर यानी प्रास्ताविक केल्यानंतर सानिया शेख या शालेय विद्यार्थीनीने ‘किशोर’ या दिवाळी अंकाविषयी विचार व्यक्त केले. ‘आपण प्रथमच हा दिवाळी अंक वाचला असून आपल्याला तो आवडला असल्याचे तिने सांगितले. त्यातील जंगलातील धाडस’ या सारख्या गोष्टी आवडल्या, तसेच चित्रकोडे, ठिपक्यांची चित्रे ही सदरेही आवडल्याने त्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे तिने सांगितले. मानसी गवंडे यांनी ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाबद्दल आपले विचार व्यक्त केले. ‘आपलं माणूस’ या विषयाला वाहिलेला हा अंक आपल्याला आवडल्याचे त्यानी सांगितले. तसेच त्यातील ‘भाऊसाहेब बांदोडकर’ आणि ‘ऑक्सफर्डचे दिवस’ हे दोन लेख विशेष भावल्याचेही त्या म्हणाल्या. आजगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक उत्तम भागीत सर यांनी यांनी ‘तरुण भारत’ या दिवाळी अंकाविषयी आपले विचार व्यक्त केले. त्यातील ‘शरदाचं चांदणं’ आणि ‘सावट’ या दोन कथा विशेष आवडल्याचे सांगितले; कारण सांगताना ते म्हणाले, “त्या कथेतील वास्तव मी माझ्या गावाकडे अनुभवले आहे.” त्यानंतर संकेत येरागी या युवा गझलकाराने दिवाळी अंकाविषयी आपले मत व्यक्त केले. ‘आपल्याला छोटे कमी पानांचे अंक आवडतात. तसेच स्थानिक दिवाळी अंक अधिक महत्त्वाचे वाटतात, कारण त्यातून नवोदित लेखकाला संधी मिळते.’ असे तो म्हणाला. शेवटी विनय सौदागर यांनी कालनिर्णय, पद्मगंधा, लोकसत्ता, मटा, आवाज,ग्रहसंकेत आधी अनेक अंकांचा आढावा घेतला. या कार्यक्रमास सिंधु दिक्षित, सरोज रेडकर, स्नेहा नारींगणेकर अनिता सौदागर आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.