सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : दारू साठी पैसे न दिल्याच्या रागातून स्वतःच्या पत्नीवर रॉकेल ओतून जीवे ठार मारणाऱ्या दीपक लक्ष्मण जंगले ( वय 37, रा. गोवळ धनगरवाडी , ता देवगड ) याचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी फेटाळला. याकामी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. दारूसाठी मागितलेले पैसे पत्नीने दिले नाही या रागातून आरोपी दीपक जंगले याने आपली पत्नी दीपाली हिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले होते. यात दीपाली गंभीर जखमी झाली होती.ही घटना 26 ऑक्टोबर 2020 मध्ये घडली होती. दीपाली हिच्या फिर्यादीवरून आरोपी दीपक याला 29 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. तिच्यावर कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचे निधन झाले होते. आरोपी दीपक याला 29 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर आरोपी दीपक जंगले हा न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपीच्या जामीन अर्जाला हरकत घेताना सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपी दीपक याला दारूचे व्यसन असून त्याला जामीन मंजूर झाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, साक्षीदार हे एकाच गावात राहणारे असल्याने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका पोचवू शकतो, आरोपिकडून पुन्हा गुन्हा होऊ शकतो हे मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणत आरोपी चा जामीन अर्ज नामंजूर करण्यासाठी युक्तिवाद केला. सरकारी वकील देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश डॉ जोशी यांनी आरोपी दीपक जंगले चा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला.












