सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!

‘सिंधुदुर्ग हे आपले कुटुंब’ मानून संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्र या – पालकमंत्री नितेश राणे

संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत विविध संस्था, संघटना व तज्ज्ञांची बैठक

पालकमंत्री नितेश राणे यांनी सेवाभावी संस्थांशी साधला संवाद

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हे आपले कुटुंब आहे. या कुटुंबावर संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीचे संकट निर्माण होत असताना समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने योगदान देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक, विविध संस्था, सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करावा. लोकसहभागातून जलसंवर्धनाची कामे, जनजागृती, श्रमदान यातून जिल्ह्याच्या एकजुटीची लोकचळवळ बनली पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती, घटत चाललेली पाणीपातळी आणि आगामी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत मायनाक भंडारी सभागृहात विविध संस्था, संघटना व तज्ज्ञांची बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील व्यापारी महासंघ, पाणी व कृषी क्षेत्रात कार्यरत संस्था, रोटरी व लायन्स क्लब, फार्मासिस्ट असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघटना, हॉटेल महासंघ, जिल्हा पत्रकार संघ यांसह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. पाणी परिषदेचे डॉ. अविनाश पोळ यांनी भूजल सर्वेक्षण विभागाच्या मदतीने जलसंधारणाच्या कामांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करण्याची सूचना केली. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी पाण्याचे स्रोत बळकट करणे, जलसंधारणाची कामे वाढविणे आणि उपलब्ध साधनसंपत्तीचे भविष्यातील गरजांच्या दृष्टीने नियोजन करण्याबाबत सूचना केल्या. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या अनुभवाची गरज असल्याचे सांगत प्रशासनाच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रत्यक्षात उभी राहिली पाहिजेत. जिल्ह्यातील प्रत्येक भागात स्थानिक गरजेनुसार बैठका घेऊन कृती आराखडा तयार करावा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला दिले. जिल्ह्यातील जेसीबी व डंपर व्यावसायिक संघटनांनी या कामात योगदान द्यावे, तसेच शाळा-महाविद्यालये, स्काऊट-गाईडमधील विद्यार्थी आणि स्वयंसेवक यांनाही जलसंधारणाच्या कामात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा, चारा बियाण्यांची उपलब्धता, पानवठे व झरे बळकट करणे, शेततळी घेणे, पाणीटंचाईच्या भागात बंधाऱ्यांना प्राधान्य देणे आणि पाण्याची पातळी वाढविणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यावर भर देण्यात आला.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जलसंधारणाच्या बंधाऱ्यांसाठी २५ हजार रिकामी सिमेंट पोती उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. भगीरथ या सामाजिक संस्थेने दुष्काळ निवारण यासाठी आम्ही १० लाख रुपयांचा निधी वेगळा काढून ठेवल्याचे सांगितले. यासह सध्या उपलब्ध असलेला हिरवा चारा सुकल्यानंतर वाया जाऊ नये, यासाठी तो कापून, वाळवून साठवून ठेवावा, जेणेकरून भविष्यात त्याचा जनावरांसाठी वैरण म्हणून उपयोग करता येईल, अशी सूचना यावेळी संस्थांमधून करण्यात आली. आज उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचे उद्याच्या संकटाच्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

जिल्हा बँकेने घेतलेल्या पुढाकाराच्या धर्तीवर जिल्ह्यातील उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक, सामाजिक संस्था, संघटना आणि दानशूर व्यक्तींनीही पुढे येऊन योगदान द्यावे आणि जलसंधारणाच्या प्रत्यक्ष कामात सहभागी व्हावे. प्रशासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करता येईल. ‘आपला जिल्हा, आपली जबाबदारी’ या भावनेतून सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी प्रत्येकाने आपला हातभार लावावा, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

error: Content is protected !!