फोंडाघाटमधील मंदिरामध्ये गणेश जयंती उत्साहात– भाविकांची मांदियाळी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट पंचक्रोशीतील विविध मंदिरामध्ये माघी गणेश जयंती सोहळा मोठ्या भक्तीभावाने आणि उदंड उत्साहात साजरा झाला. बाजारपेठेतील श्री देव राधाकृष्ण मंदिरात दोन दिवस विवेक विनोद गोखले यांच्या,मारुती मेस्त्री – तबला व जयवंत मेस्त्री- हार्मोनियम यांच्या साथीने सुश्राव्य कीर्तनात भाविक रंगले. दुपारी बारा वाजता फटाक्यांच्याआतषबाजीत अन गणपती बाप्पा मोरया च्या गजरात महाआरती होऊन तमाम भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

निसर्गाच्या आणि सह्याद्रीच्या कुशीतील निरव शांततेत वसलेल्या, शृंगेश्वर गणपती मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची लगबग होती. अभिषेक, पुजाअर्चा, श्री सत्यनारायण पूजा, दुपारी महाप्रसाद आणि मध्यंतरी विविध नामांकित प्रासादिक भजन मंडळांनी आपली कौशल्यपूर्ण भजने सादर केली. महिलांचे हळदीकुंकू आणि शाळा हरकुल खुर्द-गावडेवाडी यांची रंगीत संगीत दिंडी आणि सोंगी भजन सर्वांचेच आकर्षण ठरले. रात्री गणेश मंगळ युद्ध हे दशावतारी नाटक, मोचेमाडकर दशावतारी लोकनाट्य मंडळाने सादर केले. समीर सावंत आणि संदेश दळवी तसेच मंदिर व्यवस्थापन दळवीवाडी, वडण- हरकुल खुर्द यांनी हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडला.

सलग तिसऱ्या वर्षी श्री मंगलमूर्ती सांस्कृतिक कला मंच गांगोवाडी, फोंडाघाट येथे सकाळी आठ वाजता मूर्तिकार संदेश विलास लाड यांच्या उपजत कलेतून आणि कुंचलेतून साकारलेल्या श्रींच्या मूर्तीची, मिरवणुकी द्वारे प्रतिष्ठापना, आरती, महाप्रसाद या उपक्रमातून साजरी करण्यात आली. मंडळातर्फे महिलांसाठी हळदीकुंकू आणि संध्याकाळी सांज- आरती करण्यात आली. यादरम्यान विशेष प्राविण्य मिळविलेल्या वाडीतील मुला मुलींचे, ज्येष्ठ ग्रामस्थ,सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार अवचित्यपूर्ण ठरला.होम मिनिस्टर खेळाने सर्वांचीच मने जिंकली. गांगोवाडी दशावतार नाट्य मंडळाचा रुई महात्म्य हा प्रयोग लक्षवेधी ठरला .यासाठी कलामंचच्या सदस्यांचा सहभाग कौतुकास्पद होता. श्री मूर्तीची विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये होणार आहे..

फोंडाघाट- कोरगावकरवाडी येथील गणेश मंदिरात गणेश जयंती उत्साहात पार पडली. अभिषेक, पूजाअर्चा, गणेश जन्म, महाआरती व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळाच्या रिया सुतार यांचे खड्या आवाजातील भजन, तसेच स्थानिक भजने भाविकांचे लक्ष वेधून गेली. महिलांसाठी हळदीकुंकू आयोजित केले होते. गणेश मित्र मंडळाचे रमेशकाका नारकर यांचे मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांनी हा सोहळा पार पाडला…

फोंडा- गोसावीवाडी येथील निसर्गाच्या सानिध्यात मंदिरामध्ये गणेशाभिषेक,गणेशजन्म, महाआरती, महाप्रसाद, हळदीकुंकू, स्थानीक भजने, दशावतारी नाटक या कार्यक्रमाने संपन्न झाला. यावेळी विविध करमणुकीचे स्थानिक कलाकारांनी दर्शन घडविले. त्यामुळे संपूर्ण गावांमध्ये गणेश जयंती निमित्त जल्लोष पाहावयास मिळत होता…

error: Content is protected !!