सिंधुदुर्गातील आठही तालुके दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मध्ये

सिंधुदुर्ग जिल्ह्याला पालकमंत्री नितेश राणे यांच्या खंबीर नेतृत्वाची आली प्रचिती

दुष्काळसदृश परिस्थितीत सिंधुदुर्गच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे पालकमंत्री नितेश राणे

राज्यातील २६५ तालुक्यांचा ‘ट्रिगर-१’ मध्ये समावेश

शेतकऱ्यांना कर्जवसुलीपासून वीजबिलापर्यंत विविध सवलतींचा दिलासा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पावसाची तूट आणि खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचा मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसला असून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आठ तालुक्यांचा दुष्काळ व्यवस्थापनाच्या ‘ट्रिगर-१’ अर्थात ‘पहिल्या कळ’मध्ये समावेश झाला आहे. राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे कृषी आयुक्तांच्या अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर शासनाने या तालुक्यांमध्ये तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठीही शासनाच्या विविध सवलती आणि उपाययोजनांचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्यातील या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यानी काही भागांना भेटी देत भात पिकाची पाहणी केली होती. उद्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक होणार आहे.खरीप २०२६ हंगामातील परिस्थितीच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे कृषी आयुक्तांच्या २४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने Trigger-1 लागू झालेल्या तालुक्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे तसेच GPS coordinates संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Trigger-1 लागू झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये राज्य शासनाने विशेष बाब म्हणून विविध सवलती आणि उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पिक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती यांचा समावेश आहे. तसेच कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट देण्यात येणार आहे. ७.५ हॉर्सपावर क्षमतेपर्यंतच्या कृषी पंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असून, त्यावरील क्षमतेच्या पंपांना शासन निर्णयातील सवलत लागू होणार आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडू नये यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे. रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी रोहयोअंतर्गत कामांच्या निकषांमध्ये शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
पाणीटंचाईवरही तातडीच्या उपाययोजना
पाणीटंचाई निर्माण झालेल्या भागात आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, यासाठी आवश्यक व्यवस्था उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत.

पंचनाम्यांनंतर मदतीचा मार्ग होणार स्पष्ट
Trigger-1 लागू झाल्याने सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांमध्ये आता पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रत्यक्ष पिकांची स्थिती, छायाचित्रे आणि GPS coordinates यांच्या आधारे अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत देण्याच्या प्रक्रियेला पुढील दिशा मिळणार आहे. सिंधुदुर्गातील आठही तालुके दुष्काळाच्या पहिल्या कळेत आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता पंचनामे, पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण आणि शासनाकडून मिळणाऱ्या सवलतींच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लागले आहे.

error: Content is protected !!