बांदा – आंबोली मार्गावर सावंतवाडी पोलिसांची कारवाई
सावंतवाडी (प्रतिनिधी) : बांदा ते आंबोली जाणाऱ्या मार्गावर सातोळी-बावळट येथे आयशर वाहनातून होणारी बेकायदेशीर दारूची मोठी वाहतूक सावंतवाडी पोलिसांनी पकडली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी २२ लाख ८० हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि १५ लाख रुपयांचे आयशर वाहन असा एकूण ३७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांचा एक साथीदार मात्र पोलिसांची चाहूल लागताच पसार झाला आहे. जिल्हा वाहतूक शाखा सिंधुदुर्गचे पोलीस हवालदार रुक्मांगद विश्वनाथ मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बांदा-आंबोली रस्त्यावरून आयशर वाहनातून मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सातोळी-बावळट येथे सापळा रचला. संशयित चॉकलेटी रंगाचे आयशर वाहन अडवून तपासणी केली असता, त्यात ‘रॉयल इम्पॅक्ट ग्रेन व्हिस्की’ असे लेबल असलेल्या गोवा बनावटीच्या ७५० मिलि मापाच्या सीलबंद बाटल्यांचे तब्बल ३८० बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये १२ बाटल्या अशा प्रकारे २२ लाख ८० हजार रुपयांची ही दारू बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले.
या कारवाईत पोलिसांनी एकनाथ सुखदेव इंगोले (वय २६, रा. बामनी, ता. सांगोला, जि. सोलापूर) आणि भिमराव बंडू शेटे (वय २६, रा. सिकंदर टाकळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) या दोघांना जागीच अटक केली. तर त्यांचा साथीदार प्रवीण दत्ताराम खांडेकर (वय २७, रा. निजामपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) हा महाराष्ट्राची हद्द सुरू झाल्यानंतर वाहनाच्या पाठीमागून येत असल्याचे सांगून वाटेतच उतरून फरार झाला.
या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीम मुल्ला, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महिला पोलीस हवालदार कदम यांनी या गुन्ह्याची नोंद केली असून, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.












