सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काम कौतुकास्पद असे आहे. सर्व यंत्रणेने अतिशय सक्षमपणे काम केल्याने हा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. आतापर्यंत ६० टक्के आयुष्यमान कार्ड वितरित झाली आहेत. उर्वरित राहिलेली कार्ड आंगणेवाडी व कुणकेश्वर जत्रेमध्ये कॅम्प घेऊन वितरित करण्याच्या तसेच ३ मार्च रोजी होणाऱ्या पोलिओ डोस वेळी कार्ड काढण्याच्या सुविधा उपलब्ध करा अशा सूचना आरोग्य प्रशासनास दिल्या असल्याची माहिती आयुष्यमान भारत महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ ओमप्रकाश शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ ओमप्रकाश शेटे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना कामाचा आढावा घेतला.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी माहिती देताना डॉओमप्रकाश शेट्टी म्हणाले, आयुष्यमान भारत ही केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना पाच लाखापर्यंत लाभ दिला जातो. या योजनेत पिवळ्या व केसरी कार्डधारक लाभार्थ्यांना लाभ दिला जात होता, मात्र आता त्यामध्ये बदल करून पांढऱ्या रेशन कार्ड धारकांचाही समावेश करण्यात आला आहे त्यामुळे या योजनेचा सर्वाना लाभ दिला जाणार आहे. राज्यातील साडे बारा कोटी लोकांना याचा लाभ होणार आहे. आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्याचे काम २ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाले असून सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६ लाख ६२ हजार ०९४ पात्र लाभार्थी पैकी ३ लाख ९७ हजार ४४५ एवढी कार्ड काढण्यात आली आहेत. जिल्ह्याचे काम ६० टक्के एवढे पूर्ण झाले आहे तर गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ५ हजार १२२ रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून ५ कोटी ६३ लाख एवढा निधी या योजनेमार्फत खर्च करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मार्चमध्ये आंगणेवाडी व कुणकेश्वर या दोन जत्रा होणार आहेत. यासाठी या योजनेचे लाभार्थी असलेले मुंबईस्थित नागरिक गावी येणार आहेत. त्यांचे कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी या दोन्ही जत्रांमध्ये आयुष्यमान कार्ड काढण्याच्या सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. जत्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना प्रसाद रूपी आयुष्यमान कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आपले आधारकार्ड व रेशंनकार्ड घेऊन नागरिकांनी जत्रेला यावे. तसेच ३ मार्च रोजी होणाऱ्या पोलिओ डोस वेळी आयुष्यमान कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास शिल्लक राहिलेले लाभार्थी त्याचा लाभ घेऊ शकतील, या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती यावेळी डॉ शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग चा पॅटर्न राज्यभर राबवणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजना कार्ड काढण्याचे काम चांगले झाले आहे. अरोग्याच्या प्रश्नाकड़े बघताना सकारात्मक असले पाहिजे, याचा अनुभव सिंधुदुर्गात आला. सर्व यंत्रणांनी समन्वयाने व सक्षमपणे काम केल्याने हा जिल्हा ६० टक्के काम पूर्ण करून आघाडीवर राहिला आहे. उर्वरितही काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या जिल्ह्याने केलेल्या कामाचे पॅटर्न संपूर्ण राज्यामध्ये राबविणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.












