संचालक संदेश पटेल यांचे कडून विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक आणि हायस्कूलचे अभिनंदन !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : टेनिस क्रिकेट वेल्फेअर असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने, कुडाळ येथे १७ वर्षांखालील विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीत न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटचे शुभम मंगेश सावंत व जतिन संतोष हिर्लेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राहुरी, जि. अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ही निवड मिळवत प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा पुढे नेली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशालेत त्यांचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक संदेश सावंत-पटेल व प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी पर्यवेक्षक शिक्षक राठोड, शिक्षक जोईल, शिक्षक घुंगरड, शिक्षक गांगुर्डे, शिक्षक गोसावी तसेच शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांनी शुभम सावंत व जतिन हिर्लेकर यांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.











