वर्ष उलटले तरी गॅस कनेक्शन नाही

जामसंडे गॅस एजन्सीविरोधात स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा इशारा

देवगड (प्रतिनिधी) : आईच्या मृत्यूनंतर तिच्या नावे असलेले घरगुती गॅस कनेक्शन स्वतःच्या नावावर करण्याबाबत मागील वर्षभर गॅस एजन्सीच्या पायऱ्या झिजवूनही दाद न देता गॅस कनेक्शनपासून वंचित ठेवणाऱ्या जामसंडे येथील एच.पी. गॅस एजन्सी विरोधात स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी उपोषण छेडण्याचा इशारा देवगड तालुक्यातील राहाटेश्वर येथील भूमी अभिलेख खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी जगन्नाथ लक्ष्मण मोंडकर यांनी दिला आहे. याबाबत जगन्नाथ मोंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रहाटेश्वर येथील रहिवासी असलेली जगन्नाथ मोंडकर यांची आई कै. आनंदी लक्ष्मण मोंडकर यांच्या नावे सहकार समृद्धी एच.पी. गॅस एजन्सी जामसंडे येथे घरगुती गॅस कनेक्शन होते. कै. आनंदी मोंडकर यांचे निधन झाल्यामुळे तिच्या नावे असलेले घरगुती गॅस कनेक्शन कायदेशीर वारस या नात्याने स्वतःच्या नावे करण्यासाठी जगन्नाथ मोंडकर यांनी 9 सप्टेंबर 2025 पासून संबंधित गॅस एजन्सी कडे रीतसर लेखी अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह केला आहे. मात्र वर्ष उलटले तरीही जामसंडे येथील गॅस एजन्सीकडून जगन्नाथ मोंडकर यांना घरगुती गॅस कनेक्शन देण्यात आलेले नाही. वर्षभर गॅस कनेक्शन नसल्यामुळे मोंडकर यांची गैरसोय होत असून अखेर उद्या 15 ऑगस्ट रोजी गॅस एजन्सीच्या कारभाराविरोधात उपोषणाचा ईशारा मोंडकर यांनी दिला आहे.

error: Content is protected !!