खारेपाटण (प्रतिनिधी) : स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य,पाटण या संस्थेचा स्व.राजाराम डाकवे (तात्या) राज्यस्तरीय पुरस्कार – २०२६ कोंडये येथील प्रतिभाशाली कथाकार प्रकाश सकपाळ यांच्या “कुडपाण” या कथा संग्रहाला जाहीर झाला असून नवोदित साहित्यिक प्रकाश सकपाळ यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. वाचन संस्कृतीला चालना मिळावी,तसेच नवोदित आणि गुणवंत साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य, पाटण यांच्या वतीने विविध साहित्य प्रकारातील उत्कृष्ट साहित्यिकृतींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
यावर्षी या पुरस्कारासाठी राज्यभरातून विविध साहित्य प्रकारातील सुमारे ७५ पुस्तके दाखल झाली होती.पुरस्कार निवड समितीतील मान्यवर परीक्षकांनी यातील वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील लक्षवेधक अशा १५ पुस्तकांची निवड केल्याचे,स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आणि संस्थापक डॉ.संदीप डाकवे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. तर या पंधरा पुस्तकातील कोंडये येथील प्रतिभावंत लेखक प्रकाश सकपाळ यांच्या “कुडपाण “या कथासंग्रहाचा समावेश आहे.तर कुडपाण कथासंग्रह म्हणजे कोकणातील लोकजीवन,त्यांच्या भावना, संघर्ष संस्कार,नाती,आणि जगण्याचे रांगडे सौंदर्य,यांचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. या संग्रहाचे वैशिष्ट म्हणजे पारंपरिक बोलभाषा.श्री प्रकाश सकपाळ यांनी आपल्या संवेदनशील लेखणीतून कोकणातील पारंपरिक संस्कृतीचे ,अप्रतिम चित्रण केले आहे.कुडपाण,या कथासंग्रहाला जाहीर झालेला हा दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.
त्यांना स्व.राजाराम डाकवे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने,या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. निवड झालेल्या सर्व लेखकांना आणि त्यांच्या साहित्यकृतींना स्व.राजाराम डाकवे (तात्या)२०२६ हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन,एका दिमाखदार पुरस्कार वितरण कार्यक्रमात गौरविण्यात येणार असल्याचे,
संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ संदीप डाकवे, उपाध्यक्ष, आप्पासो निवडुंगे, सचिव, रेशमा डाकवे यांनी सर्व पुरस्कार लेखकांचे अभिनंदन केले आहे.











