निधी वेळेत खर्च करा; प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करावे
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नवीन आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभागाचे एकही बिल वित्त विभागात थांबणार नाही याची दक्षता घ्या .निधी वेळेत खर्च व्हावा या दृष्टीने समन्वयाने काम करा. प्रत्येक विभागाने याची खबरदारी घ्यावी. अशी सूचना आजच्या वित्त समिती सभेत सभापती संतोष साटविलकर यांनी केली.
जिल्हा परिषद वित्त समितीची सभा सभापती संतोष साटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा मुख्य लेखा वित्त अधिकारी अभिजीत पिसाळ, समिती सदस्य संजय बोबडी, वर्षा सांबारी, क्षमा हडकर ,अक्षता गावडे आदींसह खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीस प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा इमारतीच्या जागेच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली असतात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतींच्या जागा मोजणीसाठी लेखाशीर्ष तयार करण्यात आला आहे त्यामध्ये निधीची तरतूद करण्यात येणार असून यातून आवश्यक त्या ठिकाणी जागेची मोजणी करा जागेची मोजणी करण्यापूर्वी संबंधित इमारतींची वस्तुस्थिती पाहून तसा प्रस्ताव तयार करा अशी सूचना सभापती साटविलकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
यावर्षी विशेष साकव दुरुस्ती कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्या दृष्टीने आराखडा तयार करताना प्रत्येक तालुक्याचा स्वतंत्र आराखडा तयार करा त्यामध्ये अत्यावश्यक दुरुस्ती असलेल्या साकवांचा समावेश करण्यात यावा अशी सूचना सदस्य संजय बोबडे यांनी वित्त समिती सभेत केली
नवीन आर्थिक वर्षात वित्त विभागात कोणतेही बिल प्रलंबित राहाणार नाही , वित्त विभागाचे काम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा असून याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. असे आदेश यावेळी वित्त समिती सभापती संतोष साटविलकर यांनी वित्त विभागाला दिले.












