वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आसोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शितल घाडी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व मंडल अध्यक्ष पपु परब यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
आसोली ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच संकेत धुरी यांची पंचायत समिती सदस्य म्हणून निवड झाल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते. त्यामुळे या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायतीमध्ये भाजपाची एकहाती सत्ता असल्याने शितल घाडी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
नवनिर्वाचित उपसरपंच शितल घाडी यांचे अभिनंदन करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला अधिक गती देत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सत्कार समारंभाला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, पंचायत समिती सदस्य संकेत धुरी, जि.का.का. सदस्य मनवेल फर्नांडिस, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, किसान मोर्चाचे संदिप देसाई, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, ग्रामपंचायत सदस्य नेत्रा राणे, प्रशांत घाडी, बाबू घाडी यांच्यासह शितल घाडी यांचे कुटुंबीय व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












