त्या जीवघेण्या हल्ल्यामागे पूर्वनियोजित कट ?

4 दिवसानंतरही गुन्हेगार अद्याप मोकाट

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : एक दोन नव्हे तर तीन कारमधून गुंड हातात लाठ्या दगड घेऊन कणकवली सारख्या भरवस्तीत येऊन दोन युवकांवर फिल्मी स्टाईल ने जीवघेणा हल्ला करतात….घटनेला चार दिवस उलटतात तरीही गुन्हेगार मोकाट फिरतात ही घटना सिंधुदुर्ग पोलिसांना लाजिरवाणी आहे असेच म्हणावे लागेल. रविवार 10 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कणकवली बांधकरवाडी येथे दत्तमंदिर रोड लगत दत्तकृपा निवारा शेड मध्ये बसलेल्या चेतन दिलीप पवार आणि सुनील चव्हाण याना 10 हुन अधिक जणांनी बेदम मारहाण केली. काठ्या दगड वापरून चेतन चे डोके फोडण्यात आले. तर सुनील यालाही चोपण्यात आले. हल्लेखोरांनी आपली ओळख लपवण्यासाठी तोंडाला बुरखा बांधला होता आणि तिन्ही कार चे नंबर दिसणार नाहीत याचीही खबरदारी घेतलेली होती.चेतन पवार याने कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर लागलीच हल्लेखोर गजाआड होतील अशी शक्यता होती कारण कणकवली स्थानिक पोलीस  आणि सिंधुदुर्ग एलसीबी अशा जीवघेण्या हल्ल्यावेळी अलर्ट मोडवर जात तपास करते हा आजवरचा इतिहास आहे. मात्र पवार आणि चव्हाण हल्ल्यात यावेळी पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.मुळात जेव्हा 3 कार मधून हल्लेखोर येतात तेव्हा ते पूर्वनियोजन केल्याशिवाय अचानक हल्ला करूच शकत नाहीत हे सरळ आहे. त्यातही जखमींकडून हल्लेखोर कोण असू शकतात याचा तपास पोलीस करतातच. साहजिकच जखमी चेतन पवार यांच्याकडून संशयित हल्लेखोरांची नावे, ओळख पोलिसांना देण्यात आली असणारच. मग अद्याप पोलीस यंत्रणा मूग गिळून गप्प का? पोलिसांची या जीवघेण्या हळक्याबाबतीत तपास करताना आळीमिळी गुपचिळी असण्याचे कारण काय ? असा सवाल जनतेतून व्यक्त होत आहे. जर कोल्हापूर पुणे मुंबई सारखे असे जीवघेणे हल्ले कणकवली शहरात झाले तर सर्वसामान्य जनतेचे रक्षण करण्याची आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारे पोलीस खाते करतेय तरी काय ? हा सवाल कणकवलीकरांतून व्यक्त होत आहे. हा हल्ला होण्यामागे जे काही कारण असेल ते असेल पण कायदा हातात घेऊन दहशत माजवत असा खुनी हल्ला करण्याची हिंमत करणाऱ्यांना जर खाकी वर्दी ने जरब बसवली नाही तर खाकी वर्दीवर असलेला सर्वसामान्य जनतेचा विश्वास कमी होईल हे मात्र नक्की. कणकवली पोलीस आणि पर्यायाने सिंधुदुर्ग पोलिसांनी आजवर अनेक खुनी हल्ल्यांचा खुनाच्या गुन्ह्यांचा लागलीच तपास लावला आहे. कणकवली बांधकरवाडीत झालेला हा खुनी आणि पूर्वनियोजित हल्ला करण्यासाठी ज्या तीन आलिशान कार वापरण्यात आल्या त्या कार चा शोध लावणे सिंधुदुर्ग पोलिसांना अजिबात कठीण नाही आहे.रेल्वे स्टेशन तसेच कणकवली परिसरात असलेले सीसीटीव्ही म्हणजे पोलिसांचा तिसरा डोळा आहेत. सुदैवाने हा तिसरा डोळा ऍक्टिव्ह आहे. या खुनी हल्ल्याचा उलगडा करण्यासाठी फक्त गरज आहे ती पोलिस यंत्रणेने निर्भीडपणे कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपले कर्तव्य बजावण्याची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!