वैभववाडीत ढोल ताशाचा गजरात घराघरात गणरायाचे आगमन

वैभववाडी (प्रतिनिधी) : गणपती बाप्पा मोरया ! मंगल मूर्ती मोरया!! या जयघोषात ढोल ताशाचा गजरात, फटाक्यांच्या अतिषबाजी करीत तालुक्यात घराघरात गणरायाचे आगमन झाले आहे. तालुक्यात सुमारे ५ हजार ३४५ घरगुती गणपती तर ४ सार्वजनिक गणपती बसविण्यात आले आहेत.  गणरायाच्या आगमनाने संपूर्ण वातावरण भक्तीमय, उत्साही आनंदी झाले आहे.तालुक्यातील गावागावात मोठया संख्येने चाकरमानी दाखल झाल्यामुळे गावातील बंद घरीही गजबजली आहेत. गेले काही दिवस पडणाऱ्या पावसाने सकाळी उघडीप दिल्यामुळे गणरायाचे आगमन अधिक सुखकर झाले. अबालवृध्द ज्याची आतुरतेने वाट पहात होते.त्या गणपती बाप्पाचे शनिवारी सकाळी वाजत गाजत घराघरात विराजमान झाला आहे.गणेश मूर्तीची स्थापना करुन पूजा अर्चा,करण्यात आली. सगळीकडे गणपती बाप्पांची गाण्यांचे स्वर कानावर पडत आहेत.  गेले काही दिवस यासाठी गणेश भक्तांची लगबग सुरु होती.

यामध्ये अबालवृध्द मोठ्या भक्ती भावाने सहभागी झाले आहेत. कोकणातील प्रमुख सण म्हणून  गणपती उत्सवाची ओळख आहे.घरोघरी गणपती ही कोकणातील वैशिष्टपूर्ण अशी  परंपरा आहे. गणेश उत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे गणपती बाप्पाची भक्तीभावे सेवा करण्यासाठी दाखल झाले आहेत.गणेशउत्सवासाठी गेले काही दिवस घरांची झाडलोट, रंगरंगोटी, सजावट करण्यात गणेश भक्त मग्न झाले होते. रोजगार धंदयानिमित्त तालुक्यातील अनेक कुटुंबे ही मुंबई, पुणे सारख्या शहरात स्थायीक झाली आहेत. त्यामुळे अनेक घरे  वर्षभर बंद असतात. माञ या सणाला सर्वच आपल्या गावाकडे आतुरतेने धाव घेतात. त्यामुळे घरे, गावे माणसांनी गजबजली आहेत. आकर्षक रोषणाई, गणपतीचा आरस करण्यात आले आहेत.यासाठी गेले आठ दिवस तालुक्यातील बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केल्याचे चिञ पहायला मिळत होते. कोकणात दिड दिवस, पाच, दिवस व अनंतचतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते. गणेश विसर्जन होईपर्यंत दररोज आरती, भजन , महापूजा असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. विविध धार्मिक कार्यक्रमांनी गावे भक्तीमय झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!