खारेपाटण दशक्रोशीचे स्वप्न सत्यात उतरले असले तरी, प्लॅटफॉर्मसह अजूनही अनेक कामे प्रलंबित
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वार असलेल्या चिंचवली गावांतील खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन हे अखेर ७ सप्टेंबर २०२१ पासून प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले.आणि सकाळी १०:०४ वाजता गणपती स्पेशल दादर सावंतवाडी पॅसेंजर ही कोकण रेल्वेची पहिली गाडी या स्टेशनवर प्रथमच थांबली असता, खारेपाटण रोड चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समिती तसेच ग्रामस्थांच्या माध्यमातून तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभासाठी संघर्ष समितीचे अध्यक्ष नासिरभाई काझीसह इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा दिवस खारेपाटणच्या इतिहासात सोनेरी अक्षराने नोंदविला गेला. व एका नव्या विकास पर्वाला खऱ्या अर्थाने सुरवात करण्यात आली.
बौध्दजन सेवा संघ (रजि.) खारेपाटण विभाग मुंबई’च्यावतीने सन २०१२ मध्ये बाळकृष्ण जाधव आणि तत्कालीन लोकसभेचे खासदार प्रा. डॉ. भालचंद्र मुणगेकरांच्या माध्यमातून तत्कालीन केंद्रिय रेल्वेमंत्र्यांना प्रलंबित चिंचवली रेल्वे स्टेशन संदर्भात चिंचवली गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते श्री मिलिंद कांबळे यांनी प्रथम पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर, सन २०१५ मध्ये ग्रामीण पातळीवर ४०/५० गावांच्या माध्यमातून ‘खारेपाटण रोड चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समिती’ अस्तित्त्वात आली. चिंचवलीमध्ये कोकण रेल्वेचे स्टेशन व्हावे ही चिंचवली गावासहित आजूबाजूच्या सर्वच गावांची प्रबळ इच्छा होती. अखेर ३१ जानेवारी २०१६ रोजी, श्री मिलिंद कांबळे यांनी पुढाकार घेऊन काही गावकऱ्यांच्या मदतीने, मुंबईमध्ये माजी उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह चाकरमान्यांची परेल येथे बैठक आयोजीत केली. त्या बैठकीमध्ये संघर्ष समितीच्या लढ्याला सर्वांनी पुर्ण पाठिंबा दर्शवून, उपस्थित संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे, काही संघर्ष निधी जमा करुन दिला.सदर बैठकीला उपस्थित असलेल्या अभिजीत राणेंनी संघर्ष निधीसाठी रोख ₹ ११,०००/- रक्कम देऊन, कोकणचा सुपुत्र या नात्यांने तुमच्या लढ्यात माझे पुर्ण सहकार्य असेल असे त्यांनी त्यावेळी आश्वासनही दिले होते.
संघर्ष समितीच्या अथक प्रयत्नांमुळेच तत्कालीन केंद्रिय रेल्वे मंत्री नाम. सुरेश प्रभू यांनी आपल्या कार्यकाळात ‘खारेपाटण रोड चिंचवली रेल्वे स्टेशन रोड’ला मंजूरी दिली. तशी माहिती कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता यांनी २६ मे २०१६ रोजी, ओरोस येथे पत्रकार परिषदेत दिली आणि काही दिवसातचं, म्हणजे १७ जून २०१६ रोजी, केंद्रिय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी उद्घाटनही केले. याकामी, संघर्ष समितीचे अध्यक्ष नासिरभाई काझी आणि सचिव सुर्यकांत भालेकर यांच योगदान फारच मोठ आहे.
खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले असले तरी, स्टेशनला प्लॅटफॉर्म नसल्यांने खारेपाटण दशक्रोशीत सर्वत्र प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. आजारी, दिव्यांग, वयस्कर, लहान मुलांना तसेच इतर प्रवाशांना चढणे उतरणे फारच गैरसोयीचे आणि त्रासाचे होत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मांडवी, कोकण कन्या व तुतारी एक्सप्रेसला थांबा मिळाल्यास खारेपाटण दशक्रोशीतील लगतच्या गावातील प्रवाशांना राजापूर रोड किंवा वैभववाडी रोड या स्थानकांवर उतरावे लागणार नाही. कारण, कोकण रेल्वे मार्गावरील चिंचवली गावांतील खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन हे ४०/५० गावांना मध्यवर्ती असून आजूबाजूची सर्वच गांवे कोकण रेल्वेला जोडली गेलेली आहेत. प्लॅटफॉर्म संदर्भात खारेपाटण रोड चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समितीनेही संबंधितांना पत्रव्यवहार केले असून, सिंपन प्रतिष्ठानच्या माध्यमातून सरचिटणीस बाळकृष्ण जाधव यांनीही पत्रव्यवहार केले आहेत. त्याला रेल्वे प्रशासनानेही सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे, लवकरात लवकर खारेपाटण रोड रेल्वे स्थानक येथे नवीन प्लॅटफॉर्म बांधून सुद्धा दिवा सावंतवाडी पॅसेंजरसह इतर गाड्यांनाही थांबा उपलब्ध करुन दिल्यास प्रवाशांची होणारी हेळसांड दूर होईल.
खारेपाटण ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी देखील याबाबत नुकतेच केंद्रीय रेल्वे मंत्री याना खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन च्या प्लॅटफॉर्म ची उंची वाढविण्या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असून खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन वर कोकण कन्या व तुतारी एक्स्प्रेस गाड्या थांबविण्यात याव्यात अशी देखील मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.ऐन गणपतीच्या सणासुदीला खारेपाटण दशक्रोशोतील नागरिकांना गावात कोकण रेल्वे येऊन सुधा दिवा – सावंतवाडी पॅसेंजर शिवाय कोणतीच गाडी थांबत नसल्याने राजापूर, वैभववाडी व कणकवली आदी रेल्वे स्थानकावर उतरून तेथून खाजगी वाहनांना भरमसाठ पैसे देऊन घरी यावे लागत आहे. नागरिकांची होणारी ही गैरसोय रेल्वे मंत्रालयाने लक्षात घेऊन तातडीने येथे प्लॅटफॉर्म ची उंची वाढविणे व नवीन गाड्या थांबविणे बाबत कार्यवाही करावी अशी मागणी खारेपाटणसह दशक्रोशोतील नागरिकांनी केली आहे.आणि म्हणून खारेपाटण दशक्रोशोतील नागरिकांचे स्वप्न सत्यात उतरले असेल तरी येथील अनेक विकासकामे आजही प्रलंबित आहे.