शिवसेना भवन येथील मेळाव्याला मुंबईस्थित चाकरमान्यांचा प्रचंड प्रतिसाद
मुंबई (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील मुंबईस्थित चाकरमान्यांचा मेळावा 13 मार्च रोजी शिवसेना भवन येथे संपन्न झाला. या मेळाव्यात रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिकक्याने विजयी करण्याचा निर्धार कणकवली विधानसभा मतदारसंघातील मुंबईस्थित चाकरमान्यांनी केला. या मेळाव्याला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते व सिंधुदुर्ग जिल्हासंपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संजना घाडी, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचे समन्व्यक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, नगरसेवक उद्देश पाटेकर, नगरसेवक बाळासाहेब नर, नगरसेविका सुजाता पाटेकर, संजय घाडी, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर, वैभववाडी तालुकाप्रमुख रोहित पावसकर, कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके आदींसह 500 हुन अधिक मुंबईस्थित चाकरमानी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत म्हणाले की, 1990 – 91 साली शिवसेनेचा आमदार कणकवली मतदारसंघातून निवडून देण्यात मुंबईस्थित चाकरमान्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.त्याचप्रमाणे पुन्हा एकदा निर्वाणीची वेळ आली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत कोकणात आणि मुंबईत मराठी माणसाच्या विकासासाठी फक्त आणि फक्त शिवसेना पहाडासारखी उभी असणे गरजेचे आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनाच लढा देऊ शकते. दोन वेळा खासदारपदी निवडून आलेल्या विनायक राऊत यांनी आपल्या कारकिर्दीत सर्वसामान्य माणूस हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून दिल्लीत संसदेत काम केले आहे.धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आताची लोकसभा निवडणूक आहे.मूठभर धनिकांच्या भल्यासाठी भाजपा, केंद्र सरकार आणि राज्यात दळभद्री महायुती सरकार काम करत आहे. खऱ्या अर्थाने कोकणचा आपल्या गावांचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी कणकवली विधानसभा मतदारसंघात चाकरमानी शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी मेहनत घ्यावी. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विद्यमान खासदार तथा इंडिया आघाडीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी सांगितले की शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कोकणावर विशेष प्रेम आहे. कोकण आणि शिवसेना हे अतूट नाते आहे. आताची लोकसभेची लढाई ही करेंगे या मरेंगे ची निकराची लढाई आहे. दिल्लीश्वर अफजलखाना प्रमाणे आपल्या महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत. लोकसभा निवडणुकीत या धनशक्ती ला नेस्तनाबूत करून शिवसेनेची मशाल पेटत ठरवण्याची जबाबदारी आपल्या चाकरमान्यांची आहे. राजकारणाचा विचका केलेल्या महायुती सरकारला आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. सिंधुदुर्गात चिपी विमानतळ, शासकीय मेडिकल कॉलेज, रस्त्यांचे जाळे निर्माण करून दळणवळण सुविधा, लघुपाटबंधारे ची धरणे मंजूर करवून घेऊन जलसिंचनाची सोय, आदी सुविधा माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच निर्माण झाल्या आहेत. अदानी अंबानी सारख्या बड्या उद्योगपतींचे चोचले पुरवणारे सरकार हवे की सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारा खासदार आणि केंद्र सरकार हवे हे निवडण्याची ही वेळ आहे. उपनेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी सांगितले की रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील चिपळूण ते दोडामार्ग दरम्यान च्या 2100 गावातील प्रत्येक गावात पोचलेला खासदार म्हणजे विनायक राऊत आहेत. खासदारकीचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करणारा आणि सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा अशी ओळख विनायक राऊत यांची आहे. जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिकक्य विनायक राऊत याना देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक करताना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात किमान 10 हजार मतांचे लीड देण्याचं निर्धार व्यक्त केला.सूत्रसंचालन युवासेना देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी केले. आभार प्रदीप नारकर यांनी मानले