गुजराती बांधवांसमवेत नारायण राणेंनी घेतलेल्या बैठकीनंतर आ. वैभव नाईक यांची टीका
कणकवली (प्रतिनिधी) : नारायण राणेंनी काल सोमवारी गुजराती बांधवांसमवेत बैठक घेतल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. भाजप पक्ष महाराष्ट्रात स्थानिक मराठी माणसाला डावलून गुजरात्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. सुरुवातीला व्यवसायात आणि आता राजकरणात देखील गुजराती लोकांचा शिरकाव भाजप करीत आहे. मुंबईत भाजपचे ३ खासदार गुजराती आहेत. परप्रांतीय लोकांमुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत चालला आहे. आता मुंबई नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसाय क्षेत्रात गुजराती लोक आले असून भाजपकडून सुरुवातीला गुजराती लोकांची संघटना तयार करून आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी गुजराती बांधवांसमवेत बैठक घेतली.केवळ मतांच्या राजकारणासाठी भाजप पक्ष आणि नारायण राणे गुजराती लोकांना जिल्ह्याच्या राजकारणात आणून स्थानिक कोकणी मराठी माणसाचे भविष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे.अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
नारायण राणेंनी याहीपुढे जात गुजराती बांधवांसाठी सिंधुदुर्ग ते गुजरात विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन त्यांना दिले. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या काळात चिपी विमानतळावरून अनियमित विमान सेवा सुरू आहे. मात्र ही विमान सेवा सुरळीत करण्याऐवजी नारायण राणे हे मोदी, शहा आणि गुजरात्यांची लाचुगिरी करत आहेत. याच राणेंनी गुजराती लोकांना रिफायनरी प्रकल्पाच्या जमिनी मिळवून देण्यासाठी कमिशन घेतले.त्यामुळे राणेंना त्यांचा पुळका आहे. नारायण राणेंची खासदारकीची उमेदवारी जिल्ह्यातील स्थानिक मराठी कोकणी माणसाच्या मुळावर येणारी आहे. त्यामुळे कोकणी, मराठी माणसाच्या पुढील पिढीच्या उज्वल भविष्यासाठी, आणि मुंबई प्रमाणे सिंधुदुर्गची अवस्था होऊ नये यासाठी भाजपला आताच रोखणे गरजेचे आणि कोकणी मराठी माणूस भाजपचा आणि राणेंचा हा डाव हाणून पाडेल असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे. तसेच गुजराती बांधवांनी व्यवसायापुरतेच मर्यादित रहावे राजकारणात ढवळाढवळ करू नये अन्यथा सिंधुदुर्गात व्यवसायामध्ये देखील परप्रांतीय गुजराती लोकांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने आम्ही त्याला उत्तर देऊ स्थानिक लोकांच्या मुळावर येण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी आपली गाठ आहे हे लक्षात ठेवावे असा इशारा आ. वैभव नाईक यांनी दिला आहे.