सिंधुदुर्गात रक्तरंजित इतिहास रचणाऱ्या राणेंच्या खुनशी वृत्तीला मतदार धडा शिकवणार – विनायक राऊत

कातळशिल्पांचे संवर्धन करा म्हणणारे राज ठाकरे 200 कातळशिल्प असलेल्या बारसु मधील रिफायनरी चे समर्थन करतात

नारायण राणेंनी 42 हजार हेक्टर जमीनिवर वनसंज्ञा लावून सिंधुदुर्गातील जमीन मालकांना उध्वस्त केले

कुडाळ एमआयडीसी त 70 एकर मोक्याच्या जागेवर राणे समर्थकांचे भूखंड

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंसह, नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेताना काँग्रेसमध्ये असताना छातीठोकपणे रिफायनरी ला विरोध करणारे नारायण राणे, नितेश राणे खरे की आता भाजपात गेल्यावर रिफायनरी समर्थन करणारे राणे खरे ? कातळशिल्पांचे संवर्धन करण्यासाठी आग्रही भूमिका घेणारे राज ठाकरे खरे की कणकवली च्या सभेत बारसुमध्ये 200 कटाळशिल्पे आढळूनही रिफायनरी चे समर्थन करणारे राज ठाकरे खरे ? असे तिखट सवाल करतानाच सिंधुदुर्गातील 42 हजार हेक्टर जमीन वनसंज्ञेत घालून स्थानिक जमीन मालकांना नारायण राणेंनी देशोधडीला लावले आहे. एम एस एम इ चे ऑफिस प्रहार भवन मध्ये भाड्याने सुरू करून स्वतः नारायण राणे हे पहिले लाभार्थी ठरले आहेत. पत्रकार शशिकांत वारीशे चा खुनी पंढरीनाथ आंबेरकर हा भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता असून रिफायनरी कडून त्याला आर्थिक रसद पुरवली जात असल्याचे सिद्ध झाले आहे. कुडाळ एमआयडीसी मध्ये 70 एकर जमीनीचे मोक्याचे भूखंड नारायण राणे समर्थक कार्यकर्त्यांचे आहेत असे महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, सचिन सावंत, कन्हैय्या पारकर, राजू राठोड, संकेत नाईक आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मागील अडीच महिन्यांत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या झालेला जाहीर सभा, खळा बैठका, जिल्हा परिषद विभागनिहाय बैठक, विधान सभा निहाय प्रचार सभा च्या माध्यमातून सहकारी मित्रपक्ष च्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्यात यश आले आहे. शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिल्याची आणि जनतेच्या सुखदुःखात सहभागी झाल्याची पोचपावती मतदार 7 मे रोजी मतदानातून देतील. कुडाळ एमआयडीसी मध्ये 70 एकर मधील मोक्याचे भूखंड विरोधी उमेदवार नारायण राणेंच्या कार्यकत्यांनी बळकावले आहेत. राणेंच्या पडवे मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची आर्थिक लूट केली जाते. नारायण राणेंनी 42 हजार हेक्टर जमीन वनसंज्ञेखाली आणून स्थानिक जनतेला देशोधडीला लावले. नारायण राणेंच्या बुडत्या जहाजाला आधार देण्यासाठी कणकवलीत आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणात केवळ उद्धव ठाकरेंबद्दलचा द्वेष बोलून दाखवला. स्वतःचा पक्ष वाढवायची काळजी न घेता राणेंची तळी राज यांनी उचलली. रिफायनरीचे समर्थन केलेल्या राज ठाकरे यांना काल च्या सभेत एका बाजूला नारायण राणे आणि दुसऱ्या बाजूला रिफायनरी साठी जमिनी विकत घेणारे इस्टेट एजंट स्टेजवर दिसले असते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर याने पत्रकार वारीशे ची हत्या केली. हा गुंड पंढरीनाथ आंबेरकर भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. रिफायनरी साठी लँड माफिया मिश्रा शहा हे कुठून आले हे राज ठाकरे यांनी शोधावे. बारसु परिसरात सुमारे 200 कातळशिल्प आहेत, राज ठाकरे कातळशिल्पांचे समर्थन करतात आणि दुसरीकडे राज रिफायनरी चे समर्थन करतात. नेमके खरे राज ठाकरे कुठले ? काही वर्षांपूर्वी छातीठोकपणे रिफायनरी ला विरोध करणारे नारायण राणे खरे की आता सत्तेपुढे हुजरेगिरी करत रिफायनरी चे समर्थन करणारे नारायण राणे आणि त्यांचे पुत्र खरे ? याचा विचार राज ठाकरे यांनी करावा. खंडणीखोर कार्यकर्त्यांना घेऊन कणकवलीत आलात तरी राणेंसारख्या खुनशी वृत्तीचा बिमोड केल्याशिवाय कोकणी जनता राहणार नाही असा इशाराच राऊत यांनी दिला. नितेश राणे यांनी आणलेल्या प्रतिभा डेअरी ने सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे 5 कोटी रुपये ठकवले आहेत.देशातील 80 कोटी लोकांना उद्योग उभारून देण्याचे खाते नारायण राणेंकडे असताना एम एस एम ई चे पहिले लाभार्थी नारायण राणे ठरले आहेत. सिंधुदुर्गात रक्तरंजित इतिहास निर्माण करण्याचे काम नारायण राणेंनी केले. उलट मागील 10 वर्षांत आम्ही एकही राजकीय हत्या होऊ दिलेली नाही. नारायण राणेनि विकृती आणि अविचार कोकणात आणला. मताला 1 हजार राणेंकडून वाटप केले जात आहे. एकीकडे गॅस चा भाव हजार झाला नी मतदारांना एक हजार देताय ? ही लाचारी इथल्या मतदारांच्या मध्ये नसल्याने काही मतदारांनी आलेले हजार रुपयांचे पाकीट देवासमोर ठेवून राणेंना मतदान न करण्याचे निश्चित केले आहे. 7 मे रोजी राणेंचा पराभव करून मशाल निशाणीला मतदान करतील असे विनायक राऊत म्हणाले.

error: Content is protected !!