कृष्ण विवर …मानवी भावभावनांचा कल्लोळ मांडणाऱ्या उत्कंठावर्धक नाटकाचा 22 मे रोजी कणकवलीत शुभारंभाचा प्रयोग

कणकवली (प्रतिनिधी) : कृष्ण विवर म्हटलं की अवकाशातील पोकळी नजरेसमोर येते. मानवाच्या भाव भावनांमध्येही अशीच अनामिक अव्यक्त पोकळी असते. याच मानवी भावभावनांचा कल्लोळ कृष्ण विवर या दोन अंकी नाटकात मांडण्यात आला आहे. फुले आंबेडकरी साहित्याचा जागर करणाऱ्या दर्पण प्रबोधिनी ने आता कृष्ण विवर या नाटकाच्या निमित्ताने नाट्यनिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे.अत्यंत उत्कंठावर्धक असलेल्या कृष्ण विवर या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान च्या रंगमंचावर 22 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता सादर केला जाणार असल्याची माहिती झी गौरव पुरस्कार प्राप्त या नाटकाचे दिग्दर्शक अभिजित झुंजार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दर्पण प्रबोधिनी चे अध्यक्ष आनंद तांबे, अभिनेता निलेश पवार, अभिनेत्री प्रणाली चव्हाण, नेपथ्यकार राजू करंजेकर, किशोर कदम आदी उपस्थित होते.

तो एक पत्रकार. मध्यमवयीन. सौंदर्यवादाच्या पलिकडे जाण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून तार्कीकतेचा आधार आपल्या सोयीने घेत वैचारिकतेचा विभ्रम तयार करून बसला आहे. त्याच्या भोवताली त्यांनच तयार केलेली या तार्किकतेची, कथित विचारांची एक नजरकैद आहे… त्याच्या या कथित प्रगल्भ अवकाशापासून त्यानं संवेदनांना जाणिवपूर्वक दूर ठेवलंय. तारुण्यात आल्यापासून आक्रमकता विकसित केलेली. त्यामुळे कोणत्याही स्त्रीत भावनिकतेनं कधीही अडकलेला नाही. वर्चस्ववाद भिनलेला. आजतागायत तो कायम. उलट त्याच्या समर्थनार्थ चमकदार वैचारिक बैठकही जाणिवपूर्वक विकसित केलेली. एकदा अगदी अचानक त्याची मैत्रीण सरिता त्याला भेटायला येते. कॉलेजनंतर १५ वर्षांच्या काळात कधीही संपर्कात नाहीत हे दोघं. सरिता आता नटी आहे. सिरीअल्स, मराठी सिनेमे करते. सरिता समोर येऊन उभी राहताच ह्याच्या कणखर वैचारिक, तार्किक रूक्ष बुरुजाच्या दगडातून छोटासा अंकुर डोकावू लागतो. माती धसू लागते. सरिता संवेदनशील आहे. १५ वर्षांपासून खोल गहि-या कप्प्यात जपून ठेवलेल्या अनोख्या मैत्रीचा परिचित धागा ती घेऊन आलीये. पण आल्यावर याचा प्रचंड वैचारिक, आक्रमक अवकाश बघून सरिता आल्या आल्या दबून गेलीये. आधीच ती विलक्षण एकाकी पडलीये. आत पडझड सुरू झालेली आहे. व्यक्त होण्यासाठी ती आलीये. पण याच्या टोकदारपणाच्या अविर्भावात ती आणखीच खचलीये. त्याचा नेहमीचाच पुरुषी आक्रमकपणा सरिताला तेव्हाही आवडत होताच. त्या त्याच्या अनोख्या ‘पुरुषी’पणात तेव्हाही संवेदनशीलतेनं ती अनेकदा ‘समर्पित’ झालीही होती. पण आजचा हा त्याचा अविर्भाव नुसता वर्चस्ववादी, प्रोटागॉनिस्ट नसून त्याही पुढचा असल्याचं सरिताला जाणवतंय… सरिताच्या दुख-या संवेदनांचा वेध घेताना तो सतत स्वतःचं गेल्या १५ वर्षात बदलून गेलेलं अवकाश तार्किक पातळीवर मांडतेय व दुसऱ्या बाजूला नकळत स्वतःच्या जगण्याचं ऑर्युमेन्ट करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाल्यागत हुशारीनं व्यक्त होत चाललाय…. त्याचं लॉजिकही त्यानं बनवलंय. १५ वर्षांनी भेटायला आलेल्या मैत्रिणीशी तेव्हा मैत्रीपलीकडे असलेली सूप्त ओढ आज गहिरी झाली असूनही तत्वज्ञान व पुरोगामीत्वाची काहिशी डावी कडवी बैठक व्यक्त करत तिला दबून टाकण्याचा आनंदही तो मिळवतोय. मैत्रीण येणं, थांबणं ही तिची आत्यन्तिक गरज बनत चाललेली असतानाही सरितालाच हतबलतेचा फील तो देतेय… सरिताकडे मात्र हा अभिनिवेष नाहीये. एका कुठल्याशा वळणापासून स्वतःच्या जगण्याबद्दलचं औदासिन्य तिनं जवळ केलंय… नव-याशी असलेल्या नात्यातही तिनं शुष्कता आणलीय… याच तिच्या दुख-या एकाकीपणाला व्यक्त व्हायचंय… तो तिला घालवायचा नाहीये. उलट तो व्यक्त करताना तिला तो अधिक गडद नि समर्थनीय करायचाय! हिच्या अलिप्त तार्किकतेचं आकर्षणही त्याला वाटतंय… ही आक्रमकता स्वतःचं दुर्बल जगणं अधिक गडद करत चाललीये… व्यक्त ती होत चाललीये. पण तटबंद्या हिच्या ढासळत चालल्याहेत. एक रात्र घालवत सरिता निघून जाते खरं. पण हे निघून जाणं पूर्ण जाणं नाहीये… ते रेंगाळणं आहे… हवाली करणं आहे. पुन्हा येण्याचा हवाला आहे. पत्रकार असलेल्या त्याचंही…. तिच्या तार्किकतेचा तरलपणे संवेदनेकडे प्रवास सुरु झालाय… तिनं तिच्यापुरतं सजवलेलं तिचं स्वातंत्र्य आता संवेदनशीलएकाकीपणात रूपांतरीत होऊ लागलंय… दोघांना एकाच व्योमाकडे प्रवास करायला भाग पाडणारा विलक्षण अंतर्विरोध दिसू लागलाय… भावना नि तार्किकतेच्या द्वंद्वात उसळणार्या देहदत्त चेतनांचा एक धागा पुन्हा एकदा तिथं नकळत दिसू लागलाय… व्योमाकडे नेणारा… – अभिजीत झुंजारराव

error: Content is protected !!