फाेंडाघाट (प्रतिनिधी) : मागील दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका करूळ घाटमार्ग रस्त्याला बसला असून गगनबावड्यापासून वैभववाडी च्या दिशेने चार किमी अंतरावर नवीन बांधकाम केलेला सुमारे 50 मीटर रस्ता आणि त्या लगत बांधलेली नवीन संरक्षक भिंत शनिवारी 29 जून रोजी सायंकाळी कोसळली .
तळरे वैभववाडी कोल्हापूर या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या रस्त्याचे काम मागील 6 महिने सुरू आहे.करूळ घाट रस्त्याचे काम निर्धोकपणे करता यावे यासाठी महामार्ग प्रशासनाकडून हा रस्ता जवळपास सहा महिने बंद करण्यात आला आहे. घाट रस्त्याचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाने प्रशासनाकडे तीन वेळा वाढीव मुदत मागून घेतली. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात घाट रस्त्यातील कामे अपूर्ण आहेत. गेल्या दोन दिवसात घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे पहिल्या पावसातच घाट रस्ता वाहून जाण्याचा प्रकार घडल्याने रस्त्याच्या बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे या रस्त्यावरील 50 मीटरचा भराव घालून बांधलेला रस्ता व त्या लगत बांधलेली संरक्षक भिंतही कोसळल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महामार्ग प्राधिकरणाकडे हा रस्ता असल्याने अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य प्रवासी वाहनधारक करीत होते मात्र पहिल्याच पावसात रस्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.