छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार

राजकोट किल्ला पाहणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहेत. प्रत्येकाला महाराजांच्या इतिहासाबद्दल अभिमान आहे. महाराजांच्या पराक्रमातून अनेकांना प्रेरणा मिळत असते. राजकोट येथे शिवरायांच्या नावाला साजेसे असे भव्य दिव्य स्मारक उभारले जाईल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज मालवण येथील राजकोट किल्ला परिसराला भेट देऊन जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी पुतळा दुर्घटनेची गांभीर्याने चौकशी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे, तहसीलदार वर्षा झालटे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अभियंता अजित पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले पुतळा कोसळण्याची घटना दुर्देवी आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या घटनेमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. सामान्य नागरिकांच्या भावना लक्षात घेता महाराजांच्या नावाला साजेस स्मारक या ठिकाणी पुन्हा उभा करण्यात येईल. गुजरात मधील नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी कशा पद्धतीचे काम केलं आहे तसेच इतर ठिकाणी कसे काम केले आहे याचाही विचार करुन शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभारणार असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!