जिल्हा पोलीस दलातील अधिकारी वर्गाला मानवी हक्क आयोगा विषयावर मार्गदर्शन
तळेरे (प्रतिनिधी) : भारतीय लोकशाहीमध्ये राज्य घटनेने मानवाला मुलभूत हक्क,अधिकार दिलेले आहेत. त्याचा योग्य प्रकारे वापर करून अन्यायाविरुद्ध दाद मागता येते. त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे. त्याचबरोबर मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य मानवी हक्क आयोगाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध वकील ॲड.उमेश सावंत यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग- मुंबई यांच्या दिनांक २६-६-२४ च्या आदेशात नमूद केलेल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्याय निर्णयाच्या अनुषंगाने कायदेशीर तरतुदी आणि मार्गदर्शक संवेदनाशीलतेचे प्रशिक्षण अधिपत्याखालील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, यांच्या आदेशानुसार दिनांक २३ सप्टेंबर व २४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालय या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ॲड.उमेश सावंत बोलत होते.या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराला सिंधुदुर्ग पोलीस दलातील ५२ पोलीस अधिकारी प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला होता.
या प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रमुख वक्ते म्हणून ॲड.राजीव बिले, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हा सल्लागार प्रकाश तेंडुलकर, तसेच पोलीस मुख्यालयाच्या विधी अधिकारी गट (ब) श्रीमती प्रज्ञा शेलार उपस्थित होते.ॲड.राजीव बिले यांनी उच्च न्यायालयाचे काही खटल्यांचे सविस्तर विश्लेषण करून मानवाधिकाराचे कसे हनन झाले. व मानवाधिकाराचे कसे पालन करावे. याचे विश्लेषण केले.ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी राज्य मानवी हक्क आयोगाजवळ कशा पद्धतीने संघटनेच्या वतीने सर्वसामान्य माणसांच्या केस चालतात व सर्वसामान्य नागरिकांना कशाप्रकारे न्याय मिळतो. हे उदाहरणासहित स्पष्ट केले. तसेच संघटनेच्या वतीने झालेल्या कामांची थोडक्यात माहिती दिली.
त्याचप्रमाणे संघटनेचे जिल्हा सल्लागार प्रकाश तेंडुलकर यांनी मानवाधिकार कसा व कुठे वापरला जातो, याचे सविस्तर विश्लेषण केले.पोलीस मुख्यालयाच्या विधी अधिकारी गट (ब) श्रीमती प्रज्ञा शेलार यांनी पोलिसांनी आरोपी सोबत कशाप्रकारे वागावे व पोलिसांचे कर्तव्य काय आहेत याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.तर प्रशिक्षण शिबिराच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख वक्ते म्हणून ॲड.उमेश सावंत, संतोष नाईक, प्रकाश तेंडुलकर, प्रज्ञा शेलार हे उपस्थित होते. यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन उपविभागीय अधिकारी घनःश्याम आव्हाड यांनी केले. या शिबिराला मार्गदर्शन करताना ॲड.उमेश सावंत यांनी मानवाला घटनेने दिलेले मुलभूत अधिकार व उच्च न्यायालयाच्या केस संदर्भातील निर्णय उदाहरण देऊन मानवाधिकाराचे महत्त्व कसे महत्त्वाचे आहे, हे उदाहरणं देऊन सांगितले. सहारा उद्योग समूहाचे सुब्रतो रॉय यांना कशा पद्धतीने मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्यामुळे सहारा समूह कसा अडचणीत आला याचे स्पष्टीकरण दिले. अशी अनेक उदाहरणे ॲड.उमेश सावंत यांनी याप्रसंगी देत मानवाधिकाराचे महत्त्व विषद केले. त्याचप्रमाणे भारत देशामध्ये प्राचीन कालावधी पासूनच मानवाधिकार होता. याची सुंदर उदाहरणे प्राचीन कालावधीतील महाभारत व अशोक सम्राट यांचे उदाहरणे दिली तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य मानवी हक्क आयोग याची स्थापना व आयोगाची कामे याची उपयुक्त माहिती दिली.
त्याचप्रमाणे प्रकाश तेंडुलकर यांनी राज्य मानवी हक्क आयोग यासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले.संतोष नाईक यांनी पोलीस सुद्धा माणूस आहेत व त्यांना सुद्धा मानवाधिकार आहे. हे पोलीस दलातील काही पोलीस अधिकाऱ्यांची उदाहरणे देऊन सांगितले. त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणूस हा सहसा पोलीस स्टेशन किंवा कोर्ट या ठिकाणी जात नाही. त्यावेळी सर्वसामान्य माणूस हा ह्यूमन राईट संघटनेच्या एखाद्या सदस्य किंवा पदाधिकारी यांना भेटून तक्रार दाखल करतो. तसेच संघटनेच्या माध्यमातून सुद्धा सर्वसामान्यांचे कामे तसेच असंख्य प्रश्न मार्गी लागतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कोकण विभागातील ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या माध्यमातून झालेल्या कामांची माहिती दिली. तसेच महाराष्ट्रामध्ये ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी यांनी राज्य मानवी हक्क आयोग या ठिकाणी दाखल केलेल्या केस नुसार सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळाल्याचा निर्णयाच्या प्रती सादर केल्या.
पोलीस मुख्यालयाच्या विधी अधिकारी गट (ब) प्रज्ञा शेलार यांनी पोलिसांनी सर्वसामान्य माणूस, आरोपी, यांच्यासोबत अशाप्रकारे आपली वर्तणूक ठेवावी याविषयी समर्पक उदाहरणे देऊन विश्लेषण केले. या शिबिराला ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा सचिव अर्जुन परब, जिल्हा खजिनदार हनीफ भाई पीरखान, मालवण तालुका उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर, कणकवली तालुका संघटक तथा स्पेक्टोमार्टचे संचालक मंगेश चव्हाण उपस्थित होते.
या प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रमुख वक्त्यांचे स्वागत उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले. तसेच दुसऱ्या दिवशी प्रमुख वक्त्यांचे स्वागत उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आव्हाड यांनी केले. शेवटी पी.आय.संदीप भोसले यांनी सर्व उपस्थित अधिकारी व प्रमुख वक्त्यांचे आभार मानले.












