फोंडाघाट मधील मैत्रेय राजेश पेडणेकर या युवकाचे अपघाती निधन ! पंचक्रोशीवर शोककळा !

जुने- जाणते पान व्यापारी राजेश पेडणेकर यांना पुत्रशोक !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली-फोंडाघाट मार्गावर डामरे (करूळ) येथील कानडेवाडी स्टॉपजवळ ब्रेझा गाडी मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून झालेल्या अपघातात मैत्रेय उर्फ गोट्या राजेश पेडणेकर (वय २८, रा. फोंडाघाट बाजारपेठ, ता.कणकवली) यांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी रात्री ९.४५ वाजण्यापूर्वी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रेय पेडणेकर हे एमएच-०७-एजी-१६८६ क्रमांकाच्या ब्रेझा गाडीने कणकवलीहून फोंडाघाटकडे जात होते. डामरे (करूळ) येथील कानडेवाडी स्टॉपजवळ आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, फोंड्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेली. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर गाडी आदळून अपघात झाला. या अपघातात मैत्रेय पेडणेकर यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी विजय गोविंद हळदिवे (वय ५३, रा. फोंडाघाट बाजारपेठ, ता. कणकवली) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली.घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव, पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील, विनोद चव्हाण, श्री. ठोंबरे, मकरंद माने आणि अवी पाटील घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील करीत आहेत.

फोंडाघाट पंचक्रोशी वर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. मैत्रेय सदैव आनंदी, देखणा, आणि मित्र परिवारामध्ये सर्वांचा लाडका “गोट्या” या नावाने परिचित होता. बाल गोपाळ मंडळाच्या विविध उपक्रमात त्याचा वावर होता. फोंडाघाट मधील जुनी- जाणती पान व्यापारी पेढीचे राजेश पेडणेकर यांचे ते सुपुत्र होत. घटनेची बातमी कळतात त्याच्या चाहत्यांनी त्यांचे घरी एकच गर्दी केली फोंडाघाट बाजारपेठ बंद ठेवून या युवा मैत्री याला श्रद्धांजली वाहण्यात आली अंत्ययात्रे विविध स्तरातील हितचिंतक मित्रपरिवार आणि ग्रामस्थ तसेच बालगोपाळ मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.. त्याच्या पश्चात आई -वडील, आजी, बहीण, चुलते,चुलत भाऊ इत्यादी मोठा परिवार आहे.

error: Content is protected !!