वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाची वाटचाल समाधानकारक दिसत आहे. दयनीय अवस्थेत असलेला हा संघ आज उर्जीतावस्थेत आहे. या संघाला अ वर्गात आणण्यासाठी संघांचे भागभांडवल वाढविणे गरजेचे आहे. हे भाग भांडवल वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. असे आवाहन जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष शांताराम रावराणे यांनी केले. वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वासाधारण सभा संघांचे अध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष अंबाजी हुंबे, वैभववाडी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, सज्जन रावराणे, संचालक गुलाबराव चव्हाण, सीमा नानिवडेकर, पुंडलिक साळुंखे, महेश रावराणे, उज्वल नारकर, संजय रावराणे, संघांचे सचिव सिद्धेश रावराणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रावराणे यांनी संघाच्या स्थापने वेळच्या आठवणी जागृत केल्या. अनेकांच्या मेहनतीने संघाची स्थापना झाली. मधल्या काळात हा संघ तोट्यात होता. कोणत्याही वेळी संघ बंद होईल अशी अवस्था होती. मात्र काही तज्ञ लोकांनी त्यात स्वतः लक्ष घातल्याने आज संघ नफ्यात दिसत आहे. संघाची आजची वाटचाल पहाता या संघाला नक्कीच उर्जीतवस्था येईल असा विश्वास रावराणे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना संघांचे अध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी संघाची वाटचालीचा आढावा मांडला. आज जिल्ह्यात एकमेव वैभववाडी तालुका संघ नफ्यात आहे. संघावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. सर्व आजी माजी संचालकांची मेहनत यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींना जाहीर करण्यात आलेले पुरस्कार प्रदान करण्यात आले. तालुका संघामार्फत गेले अनेक वर्ष तालुक्यात शेती पशुसंवर्धन व इतर क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकरी नागरिकांचा सन्मान करण्यात येतो 2023 -24 साठी उत्कृष्ट भात पीक शेतकरी म्हणून श्री आत्माराम अच्युत खाडये राहणार नानिवडे, काजू पीक शेतकरी हिंदुराव श्रीधर पाटील राहणार करूळ, ऊस उत्पादक शेतकरी मोहन सखाराम रावराणेराहणार आचिर्ण, प्रयोगशील शेतकरी रविंद्र सुदाम गावडे राहणार नापणे, पशुपालक शेतकरी रवींद्र सूर्याजी साळुंखे राहणार कुसुर तर भरड धान्यामध्ये नाचणी पीक सतत तीन वर्ष घेतलेल्या कन्यारत्न उत्पादक महिला समूह नावळे यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झालेले खांबाळे गावचे सुपुत्र मंगेश कदम यांचाही यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.