वैभववाडी रेल्वे स्टेशनंची दर्जेदार स्टेशन म्हणून ओळखले जाईल – आमदार नितेश राणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कणकवली, ओरोस, कुडाळ रेल्वे स्टेशनप्रमाणे वैभववाडी रेल्वे स्टेशनच सुशोभीकरण करण्याचे आश्वसन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. त्यामुळे लवकरच वैभववाडी रेल्वे स्टेशनचा समावेश दर्जेदार रेल्वे स्टेशनमध्ये होईल. असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.    

कोकण रेल्वे कार्पोरेशनच्यावतीने वैभववाडी रेल्वे स्टेशन येथे बांधण्यात येणाऱ्या फूट ओव्हर ब्रिजचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष  सुधीर नकाशे, सज्जकाका रावराणे, नेहा माईणकर, शारदा कांबळे,प्राची तावडे, हुसेन लांजेकर, राजेंद्र राणे, किशोर कांबळे, रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष किशोर जैतापकर,प्रकाश जैताकर रेल्वेचे प्रोजेक्ट मॅनेजर रवींद्र कांबळे, जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई, वैभववाडी स्टेशन मास्तर श्रीमती बेटकर आदी उपस्थित होते.    

यावेळी बोलताना आमदार राणे पुढे म्हणाले, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील कणकवली,ओरोस, कुडाळ रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. हे देशातले पहिले उदाहरण आहे. त्याच धर्तीवर वैभववाडी रेल्वे स्टेशनचे ही सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी आम्ही सर्वांनी लावून धरली होती. आमच्या सर्वांच्या आग्राहाखातर पालकमंत्र्यांनी वैभववाडी रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे. त्यामुळे लवकरच वैभववाडी रेल्वे स्टेशन हे एक दर्जेदार रेल्वे स्टेशन म्हणून ओळखले जाईल. असा विश्वास व्यक्त केला.    

वैभववाडी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्याबाबत आपण गणेशउत्सवापूर्वी सूचना केल्या होत्या.त्यावेळी वैभववाडी रेल्वे स्टेशन येथे फूट ओव्हार ब्रिजची आवश्यकता होती. यासाठी आम्ही खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रेल्वे मंत्री यांच्याकडे मागणी केली होती. या ठिकाणी फूट ओव्हर ब्रिजच्या भूमिपूजन समारंभ संपन्न झाला आहे. येत्या मार्चमध्ये ब्रिजचे लोकार्पण करण्यात येईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैभववाडी रेल्वे स्थानकातील ज्या काही गैरसोयी आहेत त्या  सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याची सुरुवात झाले असून आपल्याला बदल दिसत आहेत. तालुक्यातील जनतेने किंवा प्रवाशांनी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त करणे काही चुकीचे नाही त्यासाठीच आम्ही आहेत. प्रवासी किंवा सर्वसामान्य नागरिक समाधानी झाला तरच लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही यशस्वी झालो असे मी मानतो असेही त्यांनी सांगितले.. कार्यक्रमाची प्रस्तावना रेल्वेचे अधिकारी रवींद्र कांबळे यांनी  तर सूत्रसंचालन व आभार डॉ. राजेंद्र पाताडे यांनी मानले.

error: Content is protected !!