कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सोमनाथ दत्तात्रय कदम यांच्या ‘ प्रागतिक चळवळीचे प्रवर्तक ‘ या ग्रंथास कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा कै. प्रभाकर पाध्ये स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी वाङ्ममय व वाङ्ममयेत्तर पुरस्कार देऊन कोकणातील आघाडीच्या साहित्यिकांच्या साहित्यकृतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
.सोमनाथ कदम यांच्या ‘ ‘प्रागतिक चळवळीचे प्रवर्तक’ या समीक्षा ग्रंथास वर्ष २०२२-२३ करीता कै.प्रभाकर पाध्ये स्मृती साहित्य पुरस्कार येत्या १७ नोव्हेंबर रोजी कवी केशवसुत स्मारक, मालगुंड जिल्हा रत्नागिरी येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.प्रागतिक चळवळीचे प्रवर्तक ‘ या ग्रंथाच्या माध्यमातून डॉ.सोमनाथ कदम यांनी गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, महम्मद पैगंबर, चार्वाक , संत कबीर ,गुरु रविदास, संत बसवेश्वर ,चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत सावता माळी, अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवराय, संत तुकोबाराय , बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, शहीद भगतसिंग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आणि अण्णा भाऊ साठे यांच्या प्रागतिक विचारांची समीक्षा मांडली आहे.
डॉ. सोमनाथ कदम यांनी पंधरा महत्त्वपूर्ण शोध ग्रंथाचे लेखन व संपादन केले असून या पूर्वीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्काराने त्यांना गौरविले आहे.
कणकवली महाविद्यालयातील प्रा. डॉ.सोमनाथ कदम यांच्या ग्रंथास कोकण मराठी साहित्य परिषदेचा सूप्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे ,चेअरमन प्रा.डॉ.राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, सर्व विश्वस्त व पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, तसेच शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.











