कणकवली आगारात ड्युटी नियोजनाचा मनमानी कारभार? चालकाच्या विश्रांतीला हरताळ; प्रवाशांच्या जीविताशी धोकादायक खेळ!

बोरीवली–आचरा डायरेक्ट ड्युटीनंतर चालकाला सलग ड्युट्या; वाहतूक निरीक्षक गडदे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल!

कणकवली (प्रतिनिधी) : चालकांच्या विश्रांतीचे नियम धाब्यावर बसवून ड्युटी नियोजन केले जात असेल, तर हा प्रकार केवळ प्रशासकीय मनमानी नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेला संभाव्य धोका निर्माण करणारा गंभीर विषय आहे. कणकवली आगारातील वाहतूक निरीक्षक गडदे यांच्या ड्युटी नियोजनावरून सध्या हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी बोरीवली येथून सायंकाळी १७:०० वाजता सुटणारी आणि दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ५:३० वाजता कणकवली येथे पोहोचणारी बोरीवली–आचरा डायरेक्ट ड्युटी करणारे चालक A. M. कांबळी यांना कणकवली येथे पोहोचल्यानंतर नियमानुसार आवश्यक ९ तास विश्रांती न देता पुन्हा ड्युटी क्रमांक ८८ व ८९ अशा सलग ड्युट्या लावण्यात आल्याचा प्रकार समोर येत आहे.

रात्रभर लांब पल्ल्याची ड्युटी करून आलेल्या चालकाला विश्रांती देण्याऐवजी पुन्हा सलग ड्युट्या लावण्यामागे नेमका कोणता निकष वापरण्यात आला? अतिरिक्त ओव्हरटाईम मिळविण्यासाठी चालकाच्या विश्रांतीकडे दुर्लक्ष केले जात आहे का? अधिकारी मनमानी पद्धतीने अथवा दबाव टाकून चालकांना आवश्यक विश्रांती न देता पुन्हा ड्युटीवर पाठवत आहेत का? किंवा सलग ड्युट्या लावण्यामागे काही अर्थकारण दडलेले आहे का? असे गंभीर प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहेत. एखादा अपघात घडल्यावर चौकशी समित्या नेमण्यापेक्षा अपघात होऊ नये यासाठी नियमांचे पालन करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.

वाहन चालविणे ही केवळ ड्युटी नसून शेकडो प्रवाशांच्या जीविताची जबाबदारी आहे. चालक शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकलेला असताना त्याच्याकडून पुन्हा वाहन चालविण्याची अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे? जर अशा ड्युटी नियोजनामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात घडला, तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? केवळ चालकावर जबाबदारी ढकलून प्रशासन आपली जबाबदारी झटकणार का, की ड्युटी लावणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निर्णयाचीही चौकशी होणार? तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या वरिष्ठांवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने दिलीच पाहिजेत.

कणकवली आगारातील वाहतूक निरीक्षक श्री. गडदे यांच्या ड्युटी नियोजनाबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी होत असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे सदर प्रकरण हे केवळ एका चालकाच्या ड्युटीपुरते मर्यादित न ठेवता, आगारातील संपूर्ण ड्युटी नियोजन, विश्रांतीचे नियम, अतिरिक्त ओव्हरटाईम वाटप आणि संबंधित निर्णयांची प्रशासकीय जबाबदारी यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

प्रवाशांच्या जीविताशी संबंधित बाबींमध्ये प्रशासनाने तडजोड करू नये. सदर ड्युटी नियोजनाची तातडीने चौकशी करून नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधित वाहतूक निरीक्षक गडदे यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यावर जबाबदारी निश्चित करण्याची वेळ येईल, तेव्हा प्रशासनाकडे उत्तर आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. प्रवाशांची सुरक्षितता ही एस.टी. महामंडळाची प्राथमिक जबाबदारी असताना, विश्रांतीच्या नियमांना दुय्यम स्थान देणाऱ्या ड्युटी नियोजनाला वरिष्ठ प्रशासनाने वेळीच आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एस.टी. महामंडळाच्या कारभाराबाबत वारंवार समोर येणाऱ्या मनमानी, अनियमितता व प्रशासकीय ढिसाळपणाच्या तक्रारींची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तातडीने दखल घ्यावी. जिल्ह्यातील एस.टी. महामंडळाच्या कारभाराची वस्तुनिष्ठ तपासणी करून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे, कर्मचारी हित जपणारे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवणारे प्रशासन सुनिश्चित करावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून व जिल्हावासियांकडून होत आहे.

error: Content is protected !!