मितालीच्या मदतीला अनिकेत पटवर्धन यांची धाव

अनिकेत पटवर्धन यांच्या सहकार्याने मितालीला मिळाली नवी दृष्टी

रत्नागिरी (प्रतिनिधी) :-गरजू व्यक्तीला योग्य वेळी मिळालेली मदत ही केवळ आर्थिक आधार ठरत नाही, तर तिच्या आयुष्यात नवी आशाही निर्माण करते. याचाच प्रत्यय रत्नागिरीतील २३ वर्षीय कु. मिताली राऊत हिच्या बाबतीत आला आहे. उजव्या डोळ्याच्या मोतीबिंदूमुळे दृष्टीसंबंधी त्रास सहन करणाऱ्या मितालीला भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय अनिकेत पटवर्धन यांच्या मदतीमुळे पुन्हा स्पष्ट दृष्टी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मितालीच्या उजव्या डोळ्याला मोतीबिंदू झाला होता. त्यामुळे तिला दिसण्यास अडचण येत होती. तसेच डोळ्यातून पाणी येणे, जळजळ होणे अशा त्रासांचाही सामना करावा लागत होता. तिची ही अडचण लक्षात आल्यानंतर अनिकेत पटवर्धन यांनी पुढाकार घेत तिला आवश्यक ती मदत व सहकार्य उपलब्ध करून दिले.

त्यांच्या सहकार्यामुळे सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी रत्नागिरी येथील INFIGO EYECARE HOSPITALS येथे मितालीच्या डोळ्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. मीना महामुलकर यांनी ही शस्त्रक्रिया केली. यावेळी MICS या आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला असून, डोळ्यात अत्याधुनिक Foldable TORIC EDOF लेन्स बसविण्यात आली.

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मितालीची प्रकृती स्थिर असून तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. एका तरुणीला भेडसावणाऱ्या दृष्टीच्या समस्येवर वेळेत उपचार होण्यासाठी मदतीचा हात मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

या मदतीबद्दल मितालीच्या कुटुंबीयांनी अनिकेत पटवर्धन यांचे मनःपूर्वक आभार मानले. गरजूंच्या अडचणीच्या वेळी धावून जाणे आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याची भावना या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

एका तरुणीच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश निर्माण करण्यासाठी केलेल्या या सहकार्याबद्दल अनिकेत पटवर्धन यांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!