वादळाच्या तडाख्यात चौके पीएचसी चे हजारोंचे नुकसान

चौके (प्रतिनिधी) : चौके परिसरात रविवारी दुपारी अचानक निर्माण झालेल्या वावटळीने चौके प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला जोरदार तडाखा दिला. वेगवान वाऱ्याच्या भोवऱ्यामुळे आरोग्य केंद्राच्या छतावरील सिमेंटची पत्रे फुटून उडाली. या घटनेत अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

रविवारी दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास येथील माळरानावरून वेगाने वाऱ्याचा भोवरा निर्माण झाला. घोंघावत आलेल्या या वावटळीने जवळच असलेल्या चौके प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत प्रवेश केला. मात्र, वाऱ्याला पुढे मार्ग न मिळाल्याने इमारतीच्या मध्यभागी असलेल्या छतावरील सिमेंटची पत्रे फुटून उडाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
सुदैवाने रविवारची सुट्टी असल्याने आणि दुपारची वेळ असल्यामुळे आरोग्य केंद्रात रुग्णांची वर्दळ नव्हती. मात्र, पर्यायी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी शेवाडे मॅडम आणि शिपाई नानू कुंभार हे कर्मचारी नेहमीप्रमाणे आपल्या कामावर उपस्थित होते. अचानक निर्माण झालेल्या वादळसदृश परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. या घटनेने कर्मचारीही भयभीत झाले.
घटनेची माहिती मिळताच चौकेचे सरपंच शिवप्रसाद चौकेकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. सोमवारी सकाळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. धनगे, तालुका पर्यवेक्षक हेमंतकुमार चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या अक्षता गावडे, महसूल अधिकारी पी. जी. गुरव, चौकेचे सरपंच शिवप्रसाद चौकेकर, पोलीस पाटील रोहन चौकेकर, ग्रामअधिकारी युवराज चव्हाण तसेच मालवण बांधकाम विभागाचे अधिकारी नितीन पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अचानक आलेल्या वावटळीमुळे आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नुकसान झाले असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

error: Content is protected !!