भाजप सरकारला जनतेच्या प्रश्नांपेक्षा ठेकेदारांचीच चिंता : विनायक राऊत

वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजप सरकारमधील मंत्री केवळ ठेकेदारांचे हित जपण्यात व्यस्त असून, जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. स्वतःच्या टक्केवारीचीच त्यांना चिंता आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परप्रांतीय दिल्लीवाल्यांच्या हातात देण्याचा घाट घातला जात असून, अदानींची लाचारी पत्करून भाजपने जिल्ह्याला देशोधडीला लावण्याचे काम केले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार तथा सचिव विनायक राऊत यांनी केली.

तिथवली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचे उद्घाटन माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर, कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, गौरीशंकर खोत, नगरसेवक किरण तावडे, वसंत नकाशे, तात्या सरवणकर, वसंत खानविलकर, रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, वैभववाडी संपर्कप्रमुख विठ्ठल बंड, रत्नागिरी जिल्हा उपप्रमुख रवींद्र डोळस, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण रावराणे, तालुकाप्रमुख नंदू शिंदे, राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, युवासेना प्रमुख उत्तम लोके, गुलझार काझी आदी उपस्थित होते.

दुष्काळ जाहीर केला, मग मदत कुठे?
राऊत म्हणाले, पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केल्याचे सांगितले. मात्र, दुष्काळ निवारणासाठी प्रत्यक्षात कोणत्या योजना राबविल्या, याची माहिती जनतेला द्यावी. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत मिळाली का? शेतकरी सन्मान निधीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला? याची आकडेवारी जाहीर करावी. केवळ योजनांचे श्रेय घेण्याचे काम करू नये, अशी टीका त्यांनी केली.

स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची लूट सुरू आहे. देशात महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे. सरकारी नोकऱ्यांची दारे बंद झाली असून, अनेक खासगी कंपन्याही अडचणीत आहेत. सर्वच यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरल्या आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला.

एकाच घरात मंत्री, खासदार, आमदार देणे ही जनतेची चूक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने एकाच घरात पालकमंत्री, खासदार आणि आमदारपद देऊन मोठी चूक केली आहे. देशात महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाला कंगाल करण्याचे काम केले आहे, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली.

‘शिवसेना कधीही थांबणार नाही’
माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, देशात, राज्यात आणि जिल्ह्यात सध्या प्रतिकूल परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतही आम्ही पक्षाचे काम सुरू ठेवले आहे. आपल्यासोबत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन संघटना मजबूत करा. शिवसेनेला कोणीही थांबवू शकत नाही. गेल्या दोन वर्षांत अनेक सहकारी सोडून गेले, तरी आज आम्ही जिल्ह्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘गाव तिथे शाखा, शाखेला शाखाप्रमुख’ या संकल्पनेनुसार संघटनात्मक बांधणी करा. येणारा काळ आपलाच असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक मतदारसंघात जोरदार काम करीत आहेत. अशा कार्यक्रमांमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो. पालकमंत्री नितेश राणे यांच्या योजना म्हणजे केवळ इव्हेंट असल्याची टीकाही नाईक यांनी केली.

‘या मतदारसंघाला सुशांत नाईक यांच्यासारखा आमदार हवा’
उबाठाच्या संभाव्य उमेदवारीचे संकेत; राऊत यांच्या विधानाला कार्यकर्त्यांची टाळ्यांनी दाद
या विधानसभा मतदारसंघासाठी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासारखा तरुण, तडफदार आमदार हवा, असे सूचक विधान माजी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केले. त्यांच्या या विधानामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उबाठाकडून सुशांत नाईक यांच्या उमेदवारीचे संकेत मिळाल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली. राऊत यांच्या विधानाला उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कार्यक्रमाला राजापूर, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गुलझार काझी यांनी केले.

error: Content is protected !!