लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
चौके (प्रतिनिधी) : पेंडूर गावातील १४ दिवस चालणारा मांड जत्रोत्सव येत्या जानेवारी महिन्यात होऊ घातला आहे. हा जत्रोत्सव सुरू होण्यापूर्वी कट्टा पेंडूर पराड काळसे हुबळीचा माळ हा संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने करावा या मागणीसाठी पेंडुर गावातील सर्वपक्षीय ग्रामस्थ एकत्र येत त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात सुमारे 100 ते 120 ग्रामस्थांनी सहभाग घेऊन आपला पाठिंबा दर्शविला. कट्टा पेंडूर ते काळसे–हुबळीचामाळ या रस्त्याची गेल्या तीन वर्षांत झालेली अत्यंत दयनीय अवस्था पाहता आज परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनजागृती केली. या ठिय्या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजित पाटील व सहाय्यक अभियंता सूरज गिरी यांनी भेट देऊन आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेतली. व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर यांनी भेट दिली.
सदर रस्त्याचे बांधकाम होऊन अवघी तीन वर्षे झाली असताना रस्त्याची झालेली दुरवस्था ही अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. रस्त्यावरील खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि खराब झालेली अवस्था यामुळे वाहनचालक, विद्यार्थी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी आज सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत या रस्त्याच्या समस्येबाबत जनजागृती केली. तसेच संपूर्ण रस्त्याचे नव्याने दर्जेदार व टिकाऊ बांधकाम तातडीने करण्यात यावे, अशी ठाम मागणी बांधकाम विभागच्या अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
रस्ता हा नागरिकांच्या मूलभूत सुविधेचा भाग आहे. तो दर्जेदार आणि सुरक्षित असणे हा नागरिकांचा हक्क आहे. आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे अशी काम भूमिका घेत प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याची गांभीर्याने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजित पाटील यांनी 5 किलोमीटर मंजूर असलेला रस्ता मांड जत्रोत्सवापूर्वी करून देण्याचे मान्य केले व उर्वरित रस्त्याच्या आराखडा नव्याने तयार करून मार्च 2027 पर्यंत पूर्ण रस्त्याचे काम करून देऊ असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. सदर आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर यांनी भेट दिली.
फोटो माहिती :-
पेंडूर येथे रस्ता नूतनीकरण कामासाठी रास्ता रोको आंदोलनात पेंडूर, पराड, काळसे येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते.











