पाच ताेळे साेन्यासह 35 हजाराची राेकड केली लंपास
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात रविवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीचे वास्तव समोर आले आहे. चोरट्यानी तब्बल सात बंद घरात घरफोडी केल्याचे समोर आले आहे. या चोरीत चोरट्यानी सुहास रावराणे यांच्या घरातून पाच तोळे सोन्याचे दागिने व सुमारे 35 हजारांची रोकड लंपास केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका बंद घरातून सोन्याचे रिंग चोरट्यानी लंपास केले आहेत. चोरटे सिसिटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. या चोरी प्रकरणी सुहास रावराणे यांची फिर्याद नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. घर बंद करून गेलेले काही घर मालक अध्यापही परतले नसल्याने त्यामूळे नेमकी काय चोरीला गेले याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, सोमवारी श्वान पथक, ठसे तज्ञ व स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी वैभववाडी येथे भेट देऊन माहिती घेतली. भर वस्तीत झालेल्या चोरीच्या या प्रकारमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वैभववाडी शहरातील नावळे कडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक बंगलो सिस्टीम निवासस्थान आहेत. चोरट्यानी या परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे. याच भागात आजवर अनेक वेळा चोरीचे प्रकार घडले आहेत. पोलिसांची रात्र गस्त ही ग्रामीण भागात होतं असतें. मात्र शहरात स्वतंत्र गस्त नसल्याने चोरट्यानी याचा अनेक वेळा फायदा उठवीला आहे.
नावळे कडे जाणाऱ्या रस्त्यालगत सुहास रावराणे यांचे घर आहे. येथे भाडेकरूही राहतात. स्वतः रावराणे तळमजल्यावर राहतात. दोन दिवसांपूर्वी ते मुंबई ला गेले होते. त्यांनी काही दागिने व रोकड कपाटात ठेवली होती. तर काही दागिने घरातच एका बरणी मध्ये ठेवले होते. चोरट्यानी मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट उघडून कपाटातील पाच तोळे सोने व 35 हजारांची रोकड चोरट्यानी लंपास केली. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सौ. कदम यांचे घर आहे. घराच्या तळमजल्यावर दोन भाडेकरू राहतात. तर स्वतः मालक वरच्या मजल्यावर रहातात. घर मालक काही दिवसापूर्वी मुंबईला गेले आहेत. यापैकी भाडेकरू मोरे हे शनिवारी संध्याकाळी मुंबईला गेले आहेत. याचा फायदा घेत चोरट्यांनी तळमजल्याची बंद खोली फोडली. खोलीतील कपाट फोडून कपाटातील साहित्य उसकटून टाकले.यात मोरे यांच्या मुलीची कानातील सोन्याची रिंग चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. मात्र मोरे हे मुंबई येथे आहेत. ते परत आल्यानंतरच नेमकं काय चोरीला गेले हे समजणार आहे.
चोरट्यानी बंद घरांना टार्गेट केले आहे. ज्या घरांना बाहेरून कुलूप आहे अशा घरात घरफोडी केल्याचे स्पष्ट होतं आहे. येथील रघुनाथ शेळके, सुहास रावराणे, श्री. अमर पाटील, श्री जयवंत मोरे, अंकुश पडवळ, श्री सुरेश पटेल व संदीप पाटील अशा सात घरात घरफोडी केली. मात्र बाकीच्या घरात चोरट्याच्या हाती काही लागले नाही.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सोमवारी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वानाने माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून फार काही निष्पन्न झाले नाही. शिवाय ठसे तज्ञांनी घटनास्थळी ठसे घेतले आहेत. सोमवारी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने भेट देऊन तपास सुरु केला आहे. उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु होते. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.











