आंबेरी केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा दिमाखात संपन्न

11 शाळामधील 100 मुलांचा सहभाग

चौके (प्रतिनिधी) : “जिंकायचं म्हणून खेळण्यापेक्षा स्पर्धेत उतरण महत्वाचे आहे, जर स्पर्धकच नसतील तर जिंकल्याचा आनंद घेता येत नाही त्यामुळे स्पर्धेत सहभाग घेणे अतिशय गरजेचे आहे” असे प्रतिपादन गट साधन केंद्र मालवण येतील विषयतज्ज्ञ गौरी नार्वेकर यांनी आंबेरी केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाच्या सांगता समारंभ प्रसंगी शाळा काळसे नं.1 येथे बोलताना केले.

आंबेरी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेतील समुहनृत्य व समूहगान स्पर्धा शाळा काळसे नं.1 येथे संपन्न झाल्या. लहान गट समुहनृत्य स्पर्धेमध्ये शाळा काळसे नं.1 विजेता व शाळा धामापूर बौद्धवाडी उपविजेता ठरली तर लहान गट समूहगान स्पर्धेमध्ये शाळा आंबेरी नं.1 विजेता व शाळा धामापूर बौद्धवाडी उपविजेता ठरली. विजेता व उपविजेता संघांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दोन्ही स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून भगवान काळसेकर, आंबेरी केंद्राचे केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी, धामापूर गोड्याची वाडी शाळेच्या मुख्याध्यापिका राधा घोगरे यांनी भूमिका साकारली. 

यावेळी केंद्र मुख्याध्यापक धानजी चव्हाण, पत्रकार अमोल गोसावी, आंबेरी केंद्रातील विविध शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, पालक व ग्रामस्थ यांचेसह आंबेरी केंद्रातील सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. या केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये आंबेरी केंद्रातील ११ प्राथमिक शाळांतील सुमारे १०० मुलांमुलींनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आंबेरी केंद्रातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराड  शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा कालकुंद्रीकर व काळसे बागवाडा शाळेच्या उपशिक्षिका स्वाती बोडके तसेच आभार प्रदर्शन काळसे भंडारवाडा शाळेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ नेरुरकर यांनी केले.

error: Content is protected !!