राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कार्यरत असणा-या उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार दर्जाच्या महिला अधिका-यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सोईनुसार एडिट करून महिला अधिका-यांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच जिल्हा प्रशासनाची प्रतिमा मलीन केल्याबद्दल जीवन कुडाळकर यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी,कर्मचारी यांच्याकडून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे,यांच्याकडे लेखी तक्रार,निवेदन देण्यात आलेले आहे.सदर निवेदन देताना कार्यालयातील महिला अधिकारी,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होत्या. सदर व्यक्तीने महिला अधिका-यांबद्दल जाणीवपूर्वक खोटी,चुकीची, बदनामकारक माहिती फेसबुकवर पोस्ट करुन संबंधितांना मानसिक त्रास दिल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये जीवन कुडाळकर, रा.आडेली, ता. वेंगुर्ला याच्याविरुद्ध सदर प्रकरणात कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
जीवन कुडाळकर या व्यक्तीने अंदाजे ७ ते ८ महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन चैताली सावंत, तहसिलदार (महसूल) यांचा नकार असतानाही अनधिकृतपणे व्हिडिओ चित्रीकरण केले होते. श्री.कुडाळकर यांनी सदर व्हिडिओ स्वतःच्या सोयीनुसार एडिट करून दिनांक २३ जुलै २०२६ रोजी रात्री फेसबुकवर अपलोड केला. या पोस्टमध्ये “गेल्या ३ वर्षांपासून BSNL टॉवरचे काम रखडवले” असा खोटा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.
वास्तविक पाहता चैताली सावंत यांनी तहसीलदार (महसूल) या पदाचा पदभार घेऊन केवळ १ वर्ष १० महिने झाले आहेत. तसेच BSNL टॉवर उभारणीकरिता शासकीय जमीन प्रदान करण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिनांक १/०६/२०२३ रोजीच पूर्ण झाले असून, पुढील तांत्रिक व क्षेत्रीय कामे ही थेट BSNL कार्यालयाशी संबंधित आहेत. असे असतानाही केवळ व्यक्तिगत आकस आणि अधिकारी वर्गाचे मानसिक खच्चीकरण करण्याच्या हेतूने हा बनाव रचण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच सदरची व्यक्ती वारंवार कार्यालयातील विविध शाखांमध्ये वावरत असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे अधिकारी / कर्मचारी यांच्या मध्ये भितीचे तसेच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचे या निवेदनात नमुद केलेले आहे.
संबंधित व्यक्तीकडून केवळ एकाच महिला अधिका-याला नव्हे, तर निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी, तहसिलदार वेंगुर्ला, मंडळ अधिकारी, सहायक महसूल अधिकारी यांचेही अनधिकृत चित्रीकरण करुन त्यांचे देखील व्हिडीओ सोशल मिडीयावर चुकीच्या पध्दतीने फेसबुकवर प्रसारित केलेले आहे. इतकेच नव्हे तर जिल्हा परिषद कार्यालय, सिंधुदुर्ग, भारत संचार निगम लिमिटेड कार्यालय, लघु पाटबंधारे विभाग, महावितरण कार्यालय इत्यादी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचे देखील व्हिडीओ चुकीच्या पध्दतीने श्री.कुडाळकर यांचेकडून प्रसारित करण्यात आलेले आहेत.
संबंधित व्यक्ती वारंवार कार्यालयात येऊन परवानगी नसताना अधिका-यांचे तसेच कर्मचा-यांचे चित्रीकरण करुन असे व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारीत करुन लोकांमध्ये महिला अधिका-यांची तसेच प्रशासनाची बदनामी करत आहे. चुकीची आणि खोटी माहिती देऊन अधिकारी,कर्मचारी यांचे मानसिक खच्चीकरण करणा-या, महिला अधिकाऱ्यांबद्दल चुकीच्या भावना समाजात पसरवून त्यांच्या आत्मसन्मानाला बाधा निर्माण करणा-या, तसेच त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर त्यांना अपमानास्पद वाटेल, समाजात वावरताना त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होईल,अशा प्रकारच्या भावना जाणीवपूर्वक पसरवणाऱ्या जीवन कुडाळकर या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील तरतुदीनुसार तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचेकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.












