वाढदिवसाला समाजसेवेची सुवर्णकिनार

नगरसेवक जयेश धुमाळे यांच्याकडून विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोफत २५० छत्र्यांचे वाटप

विद्यार्थ्यांना वाढदिवशी ३० डझन वह्यावाटप

कणकवली (प्रतिनिधी) :वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव नव्हे, तर समाजाप्रती असलेली बांधिलकी कृतीतून सिद्ध करण्याची संधी असल्याचे दाखवून देत कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक जयेश धुमाळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला. कणकवली शहरातील जिल्हा परिषदच्या सर्व पाच शाळांमधील सुमारे १५० विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन ३० डझन वह्यांचेही वितरण करण्यात आले. याशिवाय स्वतःच्या प्रभागातील नागरिकांसाठी आणखी १०० छत्र्यांचे मोफत वाटप करून त्यांनी समाजाप्रती असलेली आपुलकी आणि संवेदनशीलता अधोरेखित केली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत ये-जा करण्यासाठी मोठा आधार मिळणार असून, शैक्षणिक साहित्यामुळे त्यांच्या शिक्षणालाही बळ मिळणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याच्या जयेश धुमाळे यांच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यावेळी बोलताना नगरसेवक जयेश धुमाळे म्हणाले, “शिक्षण हीच आपल्या भविष्याच्या विकासाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात छोटासा का होईना, हातभार लावण्याच्या उद्देशाने छत्री आणि वह्यावाटपाचा उपक्रम राबविला आहे. समाजासाठी काहीतरी देण्याची भावना प्रत्येकाने जोपासली, तर समाज अधिक सक्षम आणि सुजाण बनेल.” उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “वाढदिवस सामाजिक स्वरूपात साजरा करण्यामागे नगरसेवक जयेश धुमाळे यांच्या मनातील सामाजिक तळमळ आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी स्पष्टपणे दिसून येते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून, अशा सामाजिक कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळेल.”

यावेळी उनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, लुकेश कांबळे, वैभव मालंडकर, निकीत मुरकर, रुपेश जाधव, प्रतीक्षा साटम, रवी भंडारे, लक्ष्मण हंनिकोड, चेतन माने, कृष्णा हुन्नरे, अजिंक्य लाड, हरी निखार्गे,समीर आचरेकर, बंड्या राणे, मीनल म्हसकर,श्री.आचरेकर गुरुजी, सौ.प्रविना कांबळी, सौ. दुरकर, गणेश सावंत, सौ, स्वाती सुतार, सौ नानचे, गणेश जानजुरे, राजश्री सुतार, जयराम सावंत आदी उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या नगरसेवक जयेश धुमाळे यांच्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांकडून मनापासून स्वागत होत असून, “वाढदिवस समाजासाठी” हा आदर्श त्यांनी कृतीतून जपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!