कनेडी हायस्कूल मध्ये ‘ईव्हीएम’ वर रंगला लोकशाहीचा उत्सव

विद्यार्थ्यांनी निवडले शालेय मंत्रिमंडळ

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेत मंत्रिमंडळाची निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे प्रत्यक्ष निवडणुकीच्या धर्तीवर उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आली. प्रशालेतील माध्यमिक विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत शाळेचा मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ निवडून देत विद्यार्थी स्वराज्य सभेची स्थापना केली. तसेच उच्च माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत जनरल सेक्रेटरी व मंत्रिमंडळ निवडून देत प्रशालेचे जिमखाना मंडळ प्रस्थापित केले. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये, मतदानाचे महत्त्व आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी हा अभिनव उपक्रम प्रशालेत राबवण्यात आला.

निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी प्रचार करून विद्यार्थ्यांसमोर आपल्या संकल्पना मांडल्या. मतदानाचा अधिकार, गुप्त मतदान, प्रत्येक मताचे महत्त्व, ईव्हीएम चा वापर आणि NOTA याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे संपूर्ण प्रशालेत लोकशाहीचा उत्सव पाहायला मिळाला.

मतदानाच्या दिवशी शाळा ही प्रत्यक्ष मतदान केंद्राप्रमाणेच भासत होती. विद्यार्थ्यांनी देखील त्याबद्दल रांगेत उभे राहून ईव्हीएम वरील पसंतीच्या उमेदवारास गुप्त मतदान केले. मतदान करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह, आनंद आणि जबाबदारीची भावना स्पष्टपणे दिसून येत होती. मंगळवारी ईव्हीएम द्वारे पारदर्शक पद्धतीने मतमोजणी करण्यात येणार असून निकाल घोषित केला जाणार आहे.

या निवडणूक प्रक्रियेचे मुख्य नियंत्रक म्हणून मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी यांनी काम पाहिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पर्यवेक्षक बयाजी बुराण यांनी काम पाहिले. विद्यार्थी स्वराज्य सभा प्रमुख पी. एल्. हाटले व जिमखाना मंडळ प्रमुख सौ. कदम एस्. एस्. यांनी उत्कृष्ट नियोजन केले.

मतदान केंद्राध्यक्ष म्हणून आर्. एन्. भानुसे,एस्. एस्. गुरव, माने पी. डी.,कोरडे बी. डी. यांनी काम पाहिले. सदर निवडणुकीला प्रसिद्धी देण्याचे काम सहाय्यक शिक्षक मकरंद आपटे व प्रसाद मसुरकर यांनी पाहिले. प्रशालेतील इतर सर्व शिक्षकांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. कनेडी हायस्कूलचा हा उपक्रम संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत असून उद्याचे सजग, सुजाण व जबाबदार मतदार घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

हे ईव्हीएम् ॲप प्रशालेतील ज्युनि. कॉलेज विभागातील आय. टी. विषय तज्ज्ञ राजेश कदम यांनी खूप मेहनतीने बनविले आहे. या ॲपचे वैशिष्ट्य असे आहे की या ॲपद्वारे बोगस मतदान होऊच शकणार नाही. आणि जर कोणी बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला तर या ॲपवर ‘यापूर्वीच या मतदाराने मतदान केले आहे’ असा मेसेज प्राप्त होतो. त्यामुळे कोणत्याही बोगस मतदाराला मतदान करणे शक्यच होणार नाही. तसेच एका क्लीकवर मतदानाचा निकाल मिळणे शक्य होणार आहे हे या ॲपचे वैशिष्ट्य आहे.

error: Content is protected !!