सिंधुदुर्ग जिल्ह्याला ११ हजार ८८१ घरकुल उभारणीचे उद्दिष्ट

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक किशोर काळे यांची माहिती

ओरोस (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना टप्पा २ अंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ११ हजार ८८१ घरकुल उभारणीचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक किशोर काळे यांनी दिली आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर उभारणी करण्यासाठी एक लाख २० हजार रुपये अनुदान दिले जाते. याशिवाय शौचालय उभारणीसाठी बारा हजार रुपये स्वच्छ्ता अभियान अंतर्गत दिले जातात. तसेच घराचा पाया खोदाईसाठी रोजगार हमी योजने अंतर्गत मजुरी दिली जाते. अशाप्रकारे एकूण दीड लाख रुपये एवढे अनुदान घर उभारणीसाठी दिले जाते.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अंतर्गत दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. २०२२-२३ मध्ये हा टप्पा सुरू झाला होता. परंतु या वर्षातील घरांची कामे पूर्ण न झाल्याने शासनाने २०२३-२४ या वर्षात नवीन घराना मंजुरी दिली नव्हती. परिणामी ग्रामीण भागात पात्र ठरलेले अनेक लाभार्थी प्रतीक्षेत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. शासनाने २०२४-२५ या वर्षासाठी नवीन यादी मंजूर केली आहे. त्यानुसार जिल्ह्याला या वर्षासाठी ११ हजार ८८१ एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यातील ६०५ घरांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. तर ११ हजार २७६ घरांची मंजुरी शिल्लक आहे.

error: Content is protected !!