विशाखा काव्यपुरस्कारप्राप्त सिंधुदुर्गातील पहिल्या महिला साहित्यिक ठरल्याचा आनंद – सर्वगोड
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक चा विशाखा प्रथम काव्यपुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सरिता पवार यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. सरिता पवार यांच्या निवासस्थानी सर्वगोड यांनी पवार यांच्या यशाबद्दल कौतुक केले. मराठी साहित्य विश्वात अत्यंत मानाचा आणि मराठी साहित्यिक वर्तुळातील मुख्य प्रवाहातील विशाखा हा पुरस्कार गणला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरिता पवार या विशाखा पुरस्कारप्राप्त पहिल्या महिला साहित्यिक आहेत. या पुरस्कारामुळे पवार यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचीही मान उंचावली असल्याची प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी दिली. यावेळी पत्रकार राजन चव्हाण, शैलेश कांबळे, मैत्रेयी चव्हाण उपस्थित होते.
