दिगवळे रांजणगाव येथील भैरी ब्राह्मण म्हाय उत्सव दोन गटाच्या वादात रद्द

पोलिसांची सुरक्षितता ः उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही वाद कायम

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील दिगवळे रांजणगाव आणि नरडवे भेर्देवाडी यांच्यात गेली साडेतीनशे वर्षे होणारा भैरी ब्राह्मण या जागृत देवस्थानाचा माघ पौर्णिमेचा म्हाय उत्सव यंदा दोन गटाच्या वादात रद्द झाला. पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या तडजोडीनंतरही जमीन मालकाने आपल्या जागेत येण्यासाठी एका गटाला मनाई केल्यामुळे ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी होणारा हा म्हाय उत्सव अखेर रद्द झाला. दोन्ही दिवस पोलिस सुरक्षितता वाढविण्यात आली होती. त्यामुळे अनर्थ टळला. दिगवळे रांजणगाव आणि नरडवे गावातील भेर्देवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक पद्धतीने रांजणगडावरील भैरी- ब्राह्मण देवस्थानाचा उत्सव माघ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. मात्र, या उत्सवाच्या दिवस गडाच्या पायथ्याशी असलेल्या रांजणगाव येथे गट क्रमांक १५३ (अ) या जागेत उत्सव साजरा केला जातो. या गटाचे मालक सदानंद गंगाराम केरे त्यांचे भाऊ पांडुरंग आणि हरिश्चंद्र यांचा मालकी हक्क आहे. या जागेवरून दोन गट निर्माण झाले आहेत. पहिल्या गटामध्ये जनार्दन येरम व इतर ग्रामस्थ तर दुसऱ्या गटांमध्ये हरिश्चंद्र कृष्णा परब व इतर ग्रामस्थ आहेत. हा वाद मुंबई उच्च न्यायालयात सुरू होता. मुंबई उच्च न्यायालयाने ६ फेब्रुवारी रोजी दोन्ही गटांना उत्सव एकत्रित साजरा करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे कणकवली तहसिदार दीक्षांत देशपांडे यांनीही त्याच पध्दतीने दोन्ही गटांना आदेश काढले होते. तसेच कणकवली पोलीस निरीक्षक एम.डी. जगताप यांनीही दोन्ही गटांना आदेश काढून हा उत्सव साजरा करताना कोणताही वाद होता कामा नये अशी नोटिशी बजावली होती. मात्र ११ फेब्रुवारीला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास जनार्दन येरम आणि ग्रामस्थ ज्यांच्याकडून ज्या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. अशा गट नंबर १५३ (अ) या जागेमध्ये परंपरेनुसार म्हाय उत्सव होत असतो. येथे सकाळी साडेनऊ वाजल्यापासून येरम यांच्या गटाकडून काही महिला आणि ग्रामस्थ ठाण मांडून बसले होते. तेथे हरिश्चंद्र परब यांच्या गटाकडून उत्सव साजरा करण्याच्या पूर्वतयारीसाठी गेलेल्या सर्व ग्रामस्थांना अडविण्यात आले. जागामालक सदानंद केरे यांनी आमच्या जागेत तुम्ही प्रवेश करायचा नाही असे ठणकावून सांगितले. यामुळे शाब्दिक बाचाबाची झाली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक एम.डी. जगताप यांचे पथक दाखल झाले होते. त्यांनी समजवता करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या आदेशाने दोन्ही गटांना हा उत्सव एकत्र साजरा करावा असे सांगितले. मात्र, जमीन मालक केरे कुटुंबियांकडून एकत्रित उत्सव साजरा करण्यास विरोध झाला. तसेच गट एकचे जनार्दन येरम आणि त्यांच्या ग्रामस्थांकडून हा उत्सव साजरा करण्यास अटकाव करण्यात आला. मागील वाद पुढे करून त्याला अटकाव केला. त्यानंतर दोन्ही गटाचे लोक त्याच ठिकाणी दिवस-रात्र ठाण मांडून बसले होते. यावेळी दर्शनासाठी आलेले भाविक, पारंपरिक पद्धतीने ओटी भरणाऱ्या महिला भाविक यांना रोखण्यात आले. त्यानंतर ११ फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कणकवली तहसील विभागाचे निवासी नायब तहसीलदार यादव यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटाच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे साजरा करावा असे सांगितले. मात्र, गट क्रमांक एक च्या लोकांनी त्यांला विरोध केला. त्यामुळे ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी साजरा होणारा यंदाचा वार्षिक भैरी – ब्राह्मण म्हाय उत्सव होऊ शकला नाही. आता हा वाद पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!