ऍट्रोसीटीसह पोक्सो चा गुन्हा दाखल ; आरोपी अटकेत
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यातील एका गावातील मागासवर्गीय समाजातील अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी दीप उर्फ गोट्या तुकाराम खोचरे ( वय 21, रा. हरकुळ बुद्रुक ) याच्यावर पोक्सो, बलात्कार तसेच ऍट्रोसिटी आणि भारतीय दंड संहितेच्या अन्य कलमानुसार कणकवली पोलीस ठाण्यात 10 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी दीप खोचरे याला 10 जानेवारी रोजीच कणकवली पोलिसांनी अटक केली असून त्याला 11 जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जानेवारी 2025 मध्ये पीडित युवतीशी सोशल मीडियातून आरोपी दीप खोचरे सोबत ओळख झाल्यानंतर आरोपी आणि पीडित युवतीने एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले. त्यांनतर सोशल मीडियातून चॅटिंग करत असताना आरोपी दीप याने पीडितेला तू मला आवडतेस मला तुझ्याशी रिलेशन मध्ये राहायचे आहे असे सांगितले. त्यावर पिडीत युवतीने तिची जात मागासवर्गीय समाजातील असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी दीप याने पीडितेला तुझ्या जातीमुळे मला किंवा माझ्या घरच्यांना काहीच अडचण नसल्याचे सांगितले. दरम्यान आरोपी दीप खोचरे याने 26 मार्च रोजी पीडितेला मोटारसायकल वरून मालवण मधील एका लॉजवर नेत तिला लग्नाचे आमिष दाखवले. पीडितेला तुझ्यावर माझे प्रेम असून तुझ्याशी लग्न करायचे आहे. आपल्या नात्यासाठी माझ्या घरच्यांशी बोलून त्यांना आपल्या लग्नासाठी तयार करेन असे सांगून पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. 16 एप्रिल रोजी पुन्हा पीडितेला एका चार चाकी वाहनातून वेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथे आरोपी दीप घेऊन गेला. खवणे येथील एका लॉजमधील रूम मध्ये माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगून पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले.23 मे रोजी पुन्हा मालवण येथील लॉजमध्ये नेऊन पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. 3 जून रोजी पीडितेने आरोपी दीप याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने पीडितेला तू खालच्या जातीतील आहेस. यापुढे मी तुझ्याशी कसलेच रिलेशन ठेवणार नाही.माझ्या घरातील तुला कधीच स्वीकारणार नाहीत असे सांगितले. आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून फसविल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित युवतीने कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनंतर आरोपी दीप तुकाराम खोचरे याला लागलीच अटक करण्यात आली आहे. अधिक तपास कणकवली डीवायएसपी घनश्याम आढाव करत आहेत.












