२०० हून अधिक सभासद व समाजबांधवांच्या सह्यांचे सामूहिक निवेदन; २९ नोव्हेंबरला संयुक्त सभा घेण्याची फाटक यांची सूचना
मुंबई (प्रतिनिधी) : क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या विश्वस्तपदी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आमदार रविंद्र फाटक यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी सामूहिक मागणी संस्थेचे विद्यमान सभासद, माजी पदाधिकारी, आजी-माजी कार्यकारिणी सदस्य आणि समाजबांधवांनी केली आहे. या मागणीसाठी २०० हून अधिक सभासद व समाजबांधवांच्या सह्यांचे सामूहिक निवेदन संस्थेच्या विश्वस्त मंडळ, अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. दरम्यान, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार रविंद्र फाटक यांनी संस्थेच्या विश्वस्त, सुकाणू, कार्यकारिणी आणि क्षा. म. समाज परिवर्तन समितीची संयुक्त सभा रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता घेण्याची सूचना संस्थेला पत्राद्वारे केली आहे.
सन १९३५ मध्ये स्थापन झालेली क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था गेल्या नऊ दशकांहून अधिक काळ समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी कार्यरत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबई येथे संस्थेने उभारलेल्या शैक्षणिक संस्था तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे संस्थेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. संस्थेच्या या गौरवशाली परंपरेला अधिक बळकटी देण्यासाठी अनुभवी आणि समाजाभिमुख नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आमदार रविंद्र फाटक यांना राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. विविध क्षेत्रांतील त्यांचा लोकसंपर्क आणि प्रशासकीय कामकाजाची जाण संस्थेच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकते. संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांना चालना देणे, विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी निर्माण करणे, विकासात्मक योजनांची अंमलबजावणी गतिमान करणे आणि संस्थेची प्रतिष्ठा वृद्धिंगत करणे यासाठी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, असा विश्वास निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
संस्था ही केवळ शैक्षणिक किंवा सामाजिक संघटना नसून अनेक पिढ्यांच्या योगदानातून उभी राहिलेली समाजाची ऐतिहासिक आणि अमूल्य ठेव आहे. बदलत्या काळानुसार संस्थेला अधिक सक्षम, गतिमान आणि प्रगतिशील बनविण्यासाठी अनुभवी व कर्तृत्ववान व्यक्तींना नेतृत्व प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक असल्याची भूमिका समाजबांधवांनी मांडली आहे. त्यामुळे संस्थेच्या घटनेतील तरतुदी आणि लागू कायदेशीर प्रक्रियेनुसार आमदार रविंद्र फाटक यांच्या विश्वस्तपदाच्या नियुक्तीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, १८ नोव्हेंबर २०२६ रोजी क्षा. म. समाज परिवर्तन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार रविंद्र फाटक यांची भेट घेऊन त्यांना समाज संस्थेचे विश्वस्तपद स्वीकारण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र वाळके यांच्याकडे, तर २४ नोव्हेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत डिचोलकर यांच्याकडे सह्यांचे सामूहिक निवेदन सुपूर्द करण्यात आले.
या निवेदनावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कणकवली आणि मालवण तालुक्यांसह ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहरातील समाजबांधव व भगिनींच्या सह्या आहेत. यापुढेही अशाच प्रकारची निवेदने संस्थेकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी क्षा. म. समाज परिवर्तन समितीचे अध्यक्ष सुनील जेठे, सरचिटणीस सुरेश डामरे, खजिनदार राकेश कांबळी, उपाध्यक्ष समीर हडकर, क्षा. म. समाज संस्थेचे कार्यकारिणी सदस्य अनंत बांदिवडेकर व संदीप धोपटे, माजी उपाध्यक्ष प्रकाश वाळके, अनिल साळगावकर, सचिन लोके, महेश कांबळी आणि पत्रकार नरेंद्र हडकर उपस्थित होते.
आमदार रविंद्र फाटक यांनी २९ नोव्हेंबर रोजी संयुक्त सभा घेण्याची सूचना केल्याने आता संस्थेचे विश्वस्त मंडळ या मागणीवर काय भूमिका घेते आणि पुढील निर्णय काय होतो, याकडे संस्थेचे सभासद व संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे.











