प्रत्येक गावात शाखा, प्रत्येक वॉर्डात कार्यकारिणी
नवमतदार नोंदणीसह युवकांच्या प्रश्नांवर आंदोलन छेडणार
कणकवली (प्रतिनिधी) : आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि कणकवली तालुक्यात युवासेनेची संघटनात्मक ताकद अधिक आक्रमकपणे वाढविण्यासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे युवासेनेने आता कंबर कसली आहे. युवासेना कणकवली तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक काल कणकवली येथील विजय भवन येथे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्ष उत्तम लोके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत केवळ चर्चा न करता आगामी काळात प्रत्यक्ष मैदानात उतरून संघटनात्मक विस्तार आणि युवकांच्या प्रश्नांवर संघर्ष उभारण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीत पुढील महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन अमंलबजावणी करण्याचे ठरले.
१. प्रत्येक गावात संघटनात्मक विस्तार : कणकवली तालुक्यातील प्रत्येक गावात युवासेनेची शाखा अधिक सक्षम करण्यासह ज्या ठिकाणी संघटना कमकुवत आहे, तेथे नव्याने संघटनाबांधणी करण्याचा निर्णय.
२. प्रत्येक वॉर्डात कार्यकारिणी : गाव, शाखा आणि वॉर्ड स्तरावर युवासेनेची सक्षम कार्यकारिणी उभी करून संघटनेचा थेट जनसंपर्क वाढविण्यावर भर.
३. नवमतदार नोंदणी मोहीम तीव्र करणार : तरुण मतदारांची नोंदणी प्रभावीपणे करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आणि अधिकाधिक तरुणांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे निर्देश.
४. युवकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका : बेरोजगारी, शिक्षण, रोजगार आणि स्थानिक तरुणांच्या विविध समस्यांवर आवाज उठवून आवश्यकतेनुसार आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा निर्धार.
५. सामाजिक उपक्रमांना प्राधान्य : युवकांना केंद्रस्थानी ठेवून विविध सामाजिक उपक्रम राबविणे आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
६. आगामी निवडणुकांसाठी सज्जता : आगामी राजकीय आव्हाने लक्षात घेऊन प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपापल्या कार्यक्षेत्रात संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी सक्रिय राहण्याचा निर्धार.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी युवासैनिकांना संघटनात्मक कामात अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले. युवासेना ही केवळ नावापुरती संघटना न राहता तरुणांच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून संघर्ष करणारी ताकद बनली पाहिजे. प्रत्येक गावातील तरुणांशी संपर्क वाढवून त्यांच्या समस्या जाणून घ्या. अन्यायाविरोधात आवाज उठवा आणि संघटनेची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवा, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
या बैठकीतून कणकवली तालुक्यात युवासेनेच्या आगामी संघटनात्मक वाटचालीची दिशा स्पष्ट झाली असून, शाखा विस्तारापासून नवमतदार नोंदणीपर्यंत आणि युवकांच्या प्रश्नांपासून आगामी निवडणुकांपर्यंत प्रत्येक आघाडीवर सक्रिय होण्याचा निर्धार युवासैनिकांनी केला आहे.
या बैठकीला उपशहरप्रमुख प्रतीक रासम, विभागप्रमुख किरण वर्डम, नंदकिशोर परब, निकेतन भिसे, विजय गावकर, उमेश गावडे, निलेश रावराणे, वैभव मुरकर, गुरुनाथ पेंडणेकर, सतीश परब, सतीश मर्गज, संदीप गावकर, इमाम बटावले, रमेश राणे, श्रीराम गुरव, सिद्धेश गावकर, रोशन गुरव, सत्यवान गावकर, प्रवीण गुरव, प्रवीण गावकर आदी पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.











